पाटणा – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २४३ पैकी २०२ जागा जिंकून महाविजय मिळवला आहे. या निवडणुकीत लढवलेल्या १०१ पैकी ८९ जागा जिंकून भाजप मोठा भाऊ झाला आहे, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूने १०१ पैकी ८५ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस, राजद, सीपीआय व अन्य पक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला असून त्यांना केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले. या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्रीपद आता कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकार बनवण्यासाठी १२२ आमदारांची गरज असून हा जादुई आकडा रालोआने सहज पार केला आहे.चिराग पासवान यांच्यासोबत आघाडी केल्याने जेडीयूला ३५ जागांचा फायदा झाल्याचे दिसते. तर चिराग पासवान यांच्या एनडीएसोबतच्या युतीमुळे त्यांनाही फायदा झाला आहे.
प्रशांत किशोर निष्प्रभ
निवडणूक रणनीतीकार, देशातील अनेक पक्षांना आजवर निवडणुकांमध्ये विजय मिळवून देण्यात सहाय्य करणारे प्रशांत किशोर यांनी यावेळी स्वतःचा पक्ष निवडणुकीत उतरवला होता. मात्र, त्यांना या निवडणुकीत यश मिळाले नाही. त्यांनी २३८ जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.या निवडणुकीत ‘एआयएमआयएम’ने पाच मतदारसंघांमध्ये विजय मिळवला आहे. त्या तुलनेत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेस या निवडणुकीत एमआयएमपेक्षाही मागे राहिली आहे. काँग्रेसला केवळ चार जागांवर आघाडी मिळाली आहे. मतदार यादीच्या सखोल पुनर्विलोकनामुळे (एसआयआर) यंदा बिहारच्या निवडणुकीत वादंग माजला होता. राहुल गांधी यांनी मतदार जनजागृती यात्रा काढून निवडणुकीत हवा भरली. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रालोआचे प्रमुख चेहरा होते. त्यांची लोकप्रियता आणि त्यांच्या जोरदार प्रचारामुळे भाजपप्रणीत रालोआला अभूतपूर्व विजय मिळाला.या निवडणुकीत भाजपचा विजयचा स्ट्राईक रेट ९५ टक्के आहे. यामुळे बिहारमधील भाजपची स्थिती अधिकच बळकट झाली आहे. तर राजद, काँग्रेस आणि तीन डाव्या पक्षांचा समावेश असलेल्या महाआघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. विविध सर्वेक्षणांत मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती मिळालेल्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वालाही मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे.
दिल्ली, महाराष्ट्र आणि हरयाणा येथे भाजपला सलग मिळालेल्या प्रचंड यशाच्या पार्श्वभूमीवर रालोआला बिहारमधील मिळालेला विजय महत्त्वाचा मानला जात आहे.मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याचा फायदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना व जदयूला मिळाला आहे. २०२० मध्ये केवळ ४३ जागा जिंकणाऱ्या जदयूला यंदा ८४ जागा मिळाल्या आहेत, त्यांना १९ टक्के मते मिळाली आहेत.केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पक्षाने २८ उमेदवार उभे केले व त्यांनी १९ जागा जिंकल्या आहेत.
पाटण्यात जोरदार जल्लोष
या निवडणूक विजयानंतर पाटण्यातील भाजप आणि जदयूच्या कार्यालयांमध्ये ढोल, फटाके आणि घोषणांनी जल्लोष सुरू झाला. भाजपने पाटणा शहरात लाडू वाटप केले. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांचे समर्थक ‘टायगर अभी जिंदा है’ या पोस्टरसह फोटो काढत होते.
दिग्गज विजयी
उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी (तारापूर) येथून विजयी झाले आहेत. त्यांनी राजदचे उमेदवार अरुण कुमार यांना ४५,८२० मतांनी पराभूत केले. तेजस्वी प्रसाद यादव (राघोपूर, राजद), मैथिली ठाकूर (अलीनगर, भाजप), मंगल पांडे (सिवान, भाजप), अनंत कुमार सिंग (मोकामा, जदयू), रामकृपाल यादव (दानापूर, भाजप) हे विजयी झाले आहेत.
दिग्गज पराभूत
छपरा मतदारसंघातून राजदचे उमेदवार व भोजपुरी गायक खेसारी लाल यादव निवडणूक हरले आहेत. ‘महुआ’तून जनशक्ती जनता दलाचे नेते व लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव हे पराभूत झाले. ‘कुटुंबा’ मतदारसंघातून राजेश राम (काँग्रेस) हरले आहेत.
