राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.याबाबत निर्णय घेण्यासाठी पाटणकर गटाची सोमवारी (२६ मे) महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सत्यजितसिंह यांच्या भाजप प्रवेशाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सत्यजितसिंह शरद पवारांचे जवळचे माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरजीव आहेत.
पाटण विधानसभा मतदारसंघात विद्यमान पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांचे वर्चस्व आहे. सत्यजितसिंह यांना सलग तीनवेळा शंभुराज यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागला आहे. २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिकिट न मिळाल्याने सत्यजितसिंह अपक्ष निवडणूक लढले. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू होत्या. राज्यात महायुतीचे सरकार आहे. केंद्रात देखील एनडीएचे सरकार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीच्या आधी सत्यजितसिंह मोठा निर्णय घेणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच आपली आगामी राजकीय वाटचाल ठरविण्यासाठी पाटणकर गटाने सोमवारी बैठक बोलवली आहे. माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असल्याची माहिती पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार यांनी दिली आहे. या बैठकीला सत्यजितसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर आणि तालुक्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
