अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपाला नडली
ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर अनगर (Angar) पहिलीची निवडणूक पार पडत असल्याने विशेष उत्साह दिसून येत होता. त्या निवडणुकीत भाजपकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. आतापर्यंतच्या परंपरेनुसार अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा पाटील समर्थकांना होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला थिटे यांनी पोलिस बंदोबस्तात नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला होता. उज्वला थिटे यांना पोलिस बंदोबस्तात पहाटे जाऊन अर्ज दाखल करावा लागला, यामुळे अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची राज्यभरात चर्चा झाली.
अर्ज रद्द झाला अन्…
सत्तेत असलेल्या दोन पक्ष आमने-सामने उभे राहिल्याने बिनविरोधची पंरपराही खंडीत झाली. मात्र, छाननीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला. त्यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आक्षेप घेतला. अर्जावर सूचकाची सही नाही, मतदान यादीतील प्रभाग आणि अनुक्रमांक चुकली, थिटेंनी वयाचा पुरावा अर्जासोबत जोडलेला नसून सूचकाचा मतदान यादीतील अनुक्रमांक चुकीचा आहे, अशी चार कारणं देत थिटेंचा अर्ज बाद करण्यात आला.
अजित पवारांना काय म्हणाले बाळराजे पाटील?
थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील यांनी जल्लोषात अजित पवारांना खुले आव्हान दिले. थिटे यांचा अर्ज बाद होताच नगरपंचायत कार्यालयासमोर माजी आमदार राजन पाटील समर्थकांनी जल्लोष केला. त्या जल्लोषात माजी आमदार राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत पाटील हेही सहभागी झाले होते. त्यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन जल्लोष केला. यावेळी अंगावर गुलाल, गळ्यात भगवं वस्र अशा अवस्थेत बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना आव्हान दिलं. “अजित दादा, आता बघा आमची ताकद!” ‘अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा… पण अनगरकरांचा नाद करायचा नाही,” असं बाळराजे पाटील म्हणाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
शरद पवारांच्या आमदाराची टीका
या प्रकरणावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी बाळाराजे पाटलांवर निशाणा साधला आहे. “आदरणीय राजन पाटील साहेब, आपण जेष्ठ नेते आहात, आपला नेहमीच आदर आहे, परंतु काल आपल्या चिरंजीवांचा अजितदादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून मात्र अत्यंत वाईट वाटले. आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादीत सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा विरोधकांविरोधात वापरली नाही,” अशी आठवण रोहित पवारांनी करुन दिली आहे. “ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल. मतचोरीच्या जीवावर भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही, त्यामुळे त्यांना म्हणावं थोडं दमाने घ्या,” असा खोचक सल्ला रोहित पवारांनी दिला आहे. पोस्टच्या शेवटी रोहित पवारांनी, “असो, भाजपच्या नादी लागल्यावर राजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोच! आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा..!” असंही म्हटलं आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा
अजित पवारांच्या पक्षाचे युवक उपाध्यक्ष रोहन सुरवसे यांनी बाळराजे पाटलांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. “मोहोळ तालुक्यातील अनगर येथे बाळ पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या सर्वश्रुत असणाऱ्या बालबुद्धीचे दर्शन घडवले. काही टिल्ली लोक अजित पवारांवर टीका करून स्वतःला गब्बर समाजतात. आजवर ते आणि त्यांचे सन्माननीय कुटुंब ज्या अजित पवारांच्या छत्रछायेत वाढले, घडले ते दादांना आव्हान देतात,” अशी टीका सुरवसे पाटील यांनी केली. “राजकीय क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून अजितदादांची ख्याती सर्वश्रुत आहे. दादा बाळराजे यांच्यासारख्या कृतघ्न लोकांना किंमतदेखील देत नसल्याने त्यांचा चर्चेत येण्याचा हा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्र जाणतो. या बाळ वीरांना माझं एवढच सांगण आहे की दादांच्या नखाची देखील सर तुम्हाला येणार नाही. त्यामुळे त्यांनी आपण कोणाला बोलतोय याच भान ठेवावं. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोहोळमध्ये येऊन त्यांना त्यांच्या शब्दात उत्तर देतील,” असं सुरवसे यांनी इशारा देताना म्हटलं आहे.

