पंढरपूर – पंढरपुरात नगरपरिषदेच्या मतदानापूर्वी आणि निकालापूर्वीच एका इच्छुक नगरसेवकाने दुसऱ्या नगरसेवकांच्या घरासमोर फटाके उडवले आहेत. यामुळे निकालापूर्वीच फटाके उडवले जात असल्याने पंढरपुरात राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. प्रभाग १५ अ मधून आदित्य चंद्रकलेश्वर फत्तेपूरकर (रा. पितामह, नवीन कराड नाका), धर्मराज अण्णाप्पा घोडके (रा. वृंदावन नगर, माळी वस्ती), प्रेम अनिल धोत्रे (रा. पद्मावती झोपडपट्टी) तर प्रभाग १५ ब मधून शीतल प्रीतम कुलकर्णी (रा. साईगंगा निवास, अन्नपूर्णा नगर, टाकळी), स्मिता आदित्य फत्तेपूरकर (रा. पितामह, नवीन कराड नाका), चारुशीला गिरीश कुलकर्णी (रा. गणपती मंदिराजवळील, पुंडलिक नगर), अश्विनी विवेक परदेशी (रा. पुंडलिक नगर, रेल्वे स्टेशन जवळ), चंदना दीपक येळे (रा. येळे वस्तीजवळ) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या प्रभागात निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर यांनी भाजपचे उमेदवार धर्मराज घोडके यांच्याविरुद्ध आक्षेप घेतला होता. आक्षेप मध्ये त्यांनी धर्मराज घोडके हे ठेकेदार असल्याचा आरोप केला होता. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी हा आक्षेप फेटाळला आहे. यानंतर धर्मराज घोडके यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह येळे वस्ती व आदित्य फत्तेपूरकर यांच्या घरासमोर फटाके उडवत आनंदोत्सव साजरा केला. त्यामुळे पंढरपुरात राजकीय वातावरण तापले आहे. तसेच याबाबत शहरातील नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे माघार घेण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना पंढरपुरातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.
पंढरपूर नगरपरिषदेतून दुसऱ्या दिवशी सतरा अर्ज माघारी
पंढरपूर नगरपरिषदेसाठी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशी १७उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी दिली. एक पंढरपूर नगरपरिषदेच्या ३६ नगरसेवकपदासाठी व नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल आहेत तर नगरसेवकपदासाठी ३६६ अर्ज दाखल झाले होते. नगराध्यक्षपदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी ३२३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी वैध ठरलेल्या उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज माघार घेण्याच्या बुधवारी १ अर्ज माघारी घेण्यात आला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी गुरुवारी १७ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत.
यांनी घेतले अर्ज माघारी
प्रभाग क्र.२ ब मधून श्रीनिवास धनंजय बोरगावकर (अपक्ष), अश्विनी श्रीनिवास बोरगावकर (अपक्ष), प्रभाग क्र.९ ब मधून राजू शमशुद्दीन सत्तारमेकर (अपक्ष), जावेद काशिम शेख (अपक्ष), सुनिल मोहन अधटराव (अपक्ष), प्रभाग क्र. १३ अ मधून रुक्मिणी धनाजी थोत्रे (अपक्ष), प्रभाग क्र.१३ ब मधून राजन बळीराम थोरात (अपक्ष), प्रभाग क्र. १४ अ मधून शैलजा बाळासाहेब कसबे (अपक्ष), प्रतिक्षा ऋषिकेश भालेराव (अपक्ष), प्रभाग क्र. १४ ब मधून विजय परमेश्वर वरपे (अपक्ष), तुळजाराम माणिक धोत्रे (अपक्ष), प्रभाग क्र. १७ अ मधून प्रसाद श्रीमंत यादव (अपक्ष), उमेश भगवान सर्वगोड (अपक्ष), अंबालाल किसन दोडिया (अपक्ष), प्रभाग क्र.१७ ब मधून उमा संजय घोडके (विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी), उमा संजय घोडके (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत.
सोशल मीडियावर केला संताप व्यक्त पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीतील विरोधकांनी घरासमोर फटाके उडवल्याबाबत काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. याबाबत प्रभागातील नागरिकांकडून त्यांना सहानुभूती मिळत आहे. संबंधित प्रकाराबद्दल नागरिकांमधून नाराज व्यक्त होत आहे.
पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे घरात घेतले कोंडून
प्रभाग १५ मधील एका उमेदवाराला पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिली नाही. मात्र उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावला, याचा राग मनात धरून संबंधित माघारी घेतलेल्या उमेदवाराने घरात कोंडून घेतल्याची घटना घडल्याची चर्चा सोमवारी आणि मंगळवारी प्रभागात रंगली होती. पंढरपुरात सुरुवातीपासूनच अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सुरुवातीला नागशे भोसले हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीसोबत दिसले नंतर भाजपसोबत गेले. शिवाय अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावरही जाऊन आले. मात्र, शेवटी तीर्थक्षेत्र विकास आघाडीसोबतच राहिले.
