सांगोला : गत लोकसभेला मृत्यूच्या दारात असताना मी भाजपच्या उमेदवाराला १५ हजाराचे मताधिक्य दिले. याचे फळ म्हणून मला सांगोल्यात एकटे पाडले का? असा सवाल उपस्थित करत सांगोल्यात काय चाललंय हे मुख्यमंत्र्यांना समजत नाही का? हेच माझे दुःख आहे, अशा भावना माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी बोलून दाखवल्या. शहाजी बापूंनी भाजपला थेट हिडीस, किळसवाणे राजकारण असल्याची गंभीर टीका केली होती. यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही थेट प्रतिउत्तर देताना पाच वर्षात एवढा निधी येऊनही विकास का दिसत नाही, असा सवाल करीत कोणाचे राजकारण करण्यासाठी किंवा अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक नसल्याचा टीका केली होती. आधी त्यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार बापूंनी जाहीर केला आणि मग युतीबाबत चर्चेचा कांगावा केल्याचा ठपकाही जयकुमार गोरे यांनी ठेवला होता. यावर शहाजीबापू म्हणाले, लोकसभा निवडणुकीत माझे आजारपण मी अंगावर काढले. लोकसभा निवडणूक सोडून जर मी उपचार घेतले असते तर माझा आजार असा बिकट परिस्थितीपर्यंत गेला नसता.. मात्र आपली जबाबदारी ओळखून मी उपचार घेणे टाळत लोकसभेचा प्रचार केल्यामुळे भाजपला १५ हजार मतांचे लीड मिळवून दिले. लोकसभा निवडणूक काळात तीन महिने मी साधा आजार लांबवला आणि आज साधा आजार गंभीर बनल्याचे सांगून सांगोल्यात मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांचा आक्षेप असून, ज्यांचे त्यांचे कर्म ज्याच्या त्याच्या सोबत, असे म्हणत शहाजी बापूंनी भाजपच्या धोरणावर सडकून टीका केली.
