नवी मुंबई – नेरूळ येथील बहुप्रतीक्षित छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण अखेर शुक्रवारी वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. अनेक महिन्यांपासून अनावरण रखडल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरेंनी रविवारी स्वतंत्रपणे पुतळ्याचे अनावरण केल्याने वाद निर्माण झाला होता. या कृतीबाबत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र अधिकृत अनावरणानंतर गणेश नाईक यांनी अमित ठाकरेंच्या कृतीचे समर्थन करत त्यांच्यावर दाखल गुन्हा मागे घेण्याची मागणी केली असून या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आता पोलिसांकडून यावर पुढील कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अनावरणानंतर प्रतिक्रिया देताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, अमित ठाकरे यांच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घ्या, अशी मागणी ते लवकरच पोलीस आयुक्तांकडे करणार आहेत. रविवारी नेरुळ पोलिसांनी जमावबंदीचे उल्लंघन व परवानगीशिवाय अनावरण केल्याबद्दल अमित ठाकरे आणि सुमारे ७० मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला होता. या घटनेमुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापले होते. मात्र आता नाईक यांनी केलेल्या मागणीमुळे प्रकरण शमण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, महापालिकेने पुतळ्याच्या अधिकृत अनावरणात झालेला विलंब काही तांत्रिक कारणांमुळे झाल्याचे सांगितले होते. मात्र मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि स्थानिक नागरिकांकडून सतत आंदोलने होत असल्याने आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे हे ठिकाण मागील काही दिवसांत राजकीय चर्चेचे केंद्र बनले होते. महत्त्वाची बाब म्हणजे महापालिकेने जारी केलेल्या पत्रिकेनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण होणे अपेक्षित होते. मात्र कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित नसल्याने आणि शिवसेनेचे नेते तसेच स्थानिक खासदारही गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्हे उपस्थित झाली आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण उशीर होत असल्याने अमित ठाकरे यांनी ते पाऊल उचलले. त्यांनी केलेली कृती गुन्हा नसून उत्स्फूर्त कृती आहे. राज ठाकरे आणि आमचे जुने संबंध आहेत. ते विनाकारण कायदा तोडणारे नेते नाहीत. नवी मुंबईतील आमदार आणि राज्याचा मंत्री तसेच महापालिकेत महापौर नसल्याने या जिल्ह्याचा प्रथम नागरिक म्हणून मी नवी मुंबई पोलिसांना विनंती करतो की, अमित ठाकरे यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा.
– गणेश नाईक, वनमंत्री
महाराष्ट्र सैनिकांच्या निष्ठेमुळेच हे यश – अमित ठाकरे
नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या अनावरणानंतर महाराष्ट्र सैनिक आणि शिवभक्तांना उद्देशून मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया दिली. हे यश पूर्णपणे तुमचे असल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्र सैनिकांच्या सातत्यपूर्ण लढ्याचे व निष्ठेचे कौतुक केले. तसेच याच प्रेरणेमुळे आपल्या राजकीय आयुष्यातील पहिली केस लढण्याचा आत्मविश्वास मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
अमित ठाकरे म्हणाले की, गेल्या एका आठवड्यातील घटनांचा उल्लेख करत अमित ठाकरे म्हणाले, समोरच्याने आपल्याला कितीही दाबायचा प्रयत्न केला, तरी महाराजांचा आणि देवाचा आशीर्वाद असेल तर समोरचा माणूस झुकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्मारकाचे अनावरण चार महिने रखडले याबाबत बोलताना ते म्हणाले, कदाचित ते आपल्या भाग्यातच लिहिले होते. त्यामुळे आपण सर्व फार भाग्यवान आहोत. राजकारणात येण्यापूर्वीपासून ते राज ठाकरे यांना महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठीच्या हक्कांसाठी लढताना पाहत आले आहेत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी अनेक केसेस अंगावर घेतल्या आणि त्या लढण्यात महाराष्ट्र सैनिकांनी सातत्याने साथ दिली. त्या निष्ठेमुळेच मला पहिली केस लढण्याची ताकद मिळाली, असे ते म्हणाले. अमित ठाकरे यांनी पुढे महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या जतनाबाबतही भूमिका स्पष्ट केली. मी जोतिषी नाही, पण माझ्या भाग्यात एक गोष्ट नक्की लिहिली आहे, महाराजांच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन! जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीने आपल्या गड-संस्कृतीला समोर आणायचे आहे, असे ते म्हणाले. या कार्यासाठी महाराज शक्ती देतील आणि जनसहभागातून हे साध्य होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
नेरूळ येथील पुतळ्याचे अधिकृत अनावरण झाल्यानंतर आता हा संपूर्ण विषय राजकीय चर्चेच्या पलीकडे जाऊन ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दिशेने वळत असल्याचे चित्र आहे.
