सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अनगरमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर भाजपचे नेते राजन पाटील यांचे पूत्र बाळराजे पाटील यांनी थेट अजित पवारांना थेट इशारा दिला होता. “अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण अनगरकरांचा नाद करायचा नाही”, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला होता. हे प्रकरण तापल्यानंतर राजन पाटील आणि बाळराजे पाटील यांनी दोघांनीही अजित पवारांची माफी मागितली.
या घडामोडीनंतर चर्चेत आलेले बाळराजे पाटील आता एकनाथ शिंदे यांच्या रडारवर आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बाळराजे पाटील यांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे. २००५ साली मोहोळमध्ये झालेल्या पंडित देशमुखांच्या खून प्रकरणावरून त्यांनी बाळराजे पाटील यांना टार्गेट केलं आहे. चुकीला माफी नाही, गुन्ह्याची शिक्षा होणारच, अशा शब्दांत शिंदेंनी बाळराजे पाटील यांना इशारा दिला आहे. रविवारी शिंदे मोहोळ दौऱ्यावर होते, त्यावेळी केलेल्या भाषणात एकनाथ शिंदेंनी हा इशारा दिला.
एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले की, “लोकांना निर्भयपणे जगता आलं पाहिजे. तुम्हाला गुंडाराज पाहिजे की विकास राज पाहिजे. तुम्ही सांगा, विकास करण्यासाठी आपला अजेंडा देखील विकासाचा पाहिजे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, की पंडित देशमुख यांचा मोहोळमध्ये खून झाला होता. यात जो कुणी खूनी असेल, त्याला सजा झालीच पाहिजे. चुकीला माफी नाही.”
