सातारा – नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस बाकी असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अजितदादांच्या पॅनेलला पाठिंबा जाहीर केला आहे. रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीत आम्ही सुनील माने, वासुदेव माने यांच्या पाठीशी आहोत. रहिमतपूरची जनता या निवडणूकीत भाजपाला 21-0 असा व्हाईटवॉश देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत सुनील माने यांनी नगरपालिका निवडणुकीआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीत त्यांच्याच नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) पॅनेलने भाजपाला आव्हान दिले आहे. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून सुनील माने यांच्या पत्नी नंदना माने आणि भाजपाच्या वैशाली माने यांच्यात सरळ लढत होणार आहे.
अजितदादांच्या गटाला पाठिंबा : रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एकही उमेदवार नाही. मात्र, अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष हा शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंत विचारांवर वाटचाल करणारा आहे. म्हणून काँग्रेससह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटाने शनिवारी अजितदादांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.
भाजपावर आरोप : सवंग लोकप्रियतेसाठी भाजपा नेत्यांकडून घोषणाबाजी सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी रहिमतपूरमधील कोपरा सभेत केला. आम्ही सुनील माने, वासुदेव माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व मित्र पक्षांच्या आघाडीचे सर्व 21 उमेदवार विजयी होतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
भूलथापांना बळी पडू नका : बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, काही मंडळींकडून सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा केल्या जात आहेत. जातीपातीचं राजकारण केलं जातंय. काही लोक गट बांधण्यासाठी या निवडणुकीकडे पाहत आहेत. अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. मला शरद पवार साहेबांनी मंत्री पदाची जबाबदारी दिली होती. त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे रहिमतपूरमध्ये करू शकलो. आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत. विकासकामांची परंपरा अशीच सुरू ठेवण्यासाठी सुनील माने, वासुदेव माने यांना साथ द्या.
कोणावर कधीही अन्याय होऊ दिला नाही : दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेबांचे संस्कार आपल्यावर आहेत. 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कोणावर कधीही अन्याय होऊ दिला नाही. संविधानिक पदावर असलेल्या लोकांनी खालच्या पातळीवर उतरून राजकारण करणे योग्य नाही. आम्ही तुमच्या पदाचा आदर करतो. मात्र, आम्ही अन्याय सहन करणार नाही. रहिमतपूरचे नागरिक सुज्ञ आहेत, असा टोला सुनील माने यांनी भाजपा नेत्यांना लगावला.
