काँग्रेसचे अक्कलकोटचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोटमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी म्हेत्रे यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या आजवरच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली. या सर्वांचे म्हणणे ऐकून खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, तालुक्यात आजवर दबावाचे राजकारण झाले; पण आता अनेकांना काम करण्याची संधी मिळणार आहे. कार्यकर्त्यांनी नव्याने कामाला लागावे, असा सल्ला शिंदे यांनी दिला. मात्र शिंदे यांनी तालुक्यातील भाजप आणि काँग्रेसच्या दबावाच्या राजकारणावर केलेले भाष्य चर्चेचा विषय ठरले. या बैठकीनंतर तालुक्यात नवे चित्र पाहायला मिळेल असे सांगण्यात येते.
