मुंबई – कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळालेला उद्याेगपती विजय मल्ल्या याला उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. मल्ल्याने फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) कायद्याच्या अंमलबजावणीला आव्हान दिले आहे.तथापि, त्याच्या याचिकेच्या वैधतेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ‘आधी भारतात या, मग आम्ही तुमचे म्हणणे ऐकू’, असेही न्यायालयाने फरार विजय मल्ल्याला सुनावले. मल्ल्या भारतात परत कधी येणार हे निश्चित झाल्यानंतरच याचिकेवर सुनावणी घेतली जाईल, असे न्यायालय म्हणाले.फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) कायद्याच्या अंमलबजावणीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंकड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. विजय मल्ल्यातर्फे ॲड. अमित देसाई यांनी बाजू मांडली. मल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्तींनी मल्ल्याला उद्देशून “तुम्ही आधी भारतात या, मग आम्ही तुमचे म्हणणे ऐकू’ असे सुनावले.
