पंढरपूर- आषाढी यात्रा सोहळा अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. सोहळ्याची तयारीही प्रशासकीय पातळीवर सुरू झाली असून, दररोज बैठकांचे सत्र सुरू आहेत. अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्याचा धुराळा उडत आहे. मात्र, पालखी मार्गावरील ७७ ग्रामपंचायतींना मागील वर्षी खर्च केलेल्या रकमेतील २५ टक्के अनुदान अद्याप मिळालेले नाही. मागील वर्षीचे थकीत अनुदान व चालू अनुदान पालख्या येण्याच्या किमान १५ दिवस अगोदर मिळावा, अशी मागणी आता जोर धरत असल्याचे दिसत आहे. आषाढी यात्रा सोहळा ६ जुलैला होत आहे, आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे जाणारे पालखी सोहळे ज्या मार्गावरून जातात, त्या पालखी मार्गावरील ७७ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी यात्रा अनुदान दिले जाते. मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे ३ कोटी ४६ लाख ७५ हजार रुपयांच्या रकमेचा प्रस्ताव पाठवला होता, मात्र शासनाने ७५ टक्के निधी मंजूर केला आहे. २ कोटी ६० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. उर्वरित २५ टक्के निधी नंतर दिला जाईल, असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, दुसऱ्या वर्षीच्या आषाढी यात्रेची तयारी सुरू झाली असतानाही अद्याप मागील वर्षीच्या अनुदानाची रक्कम मिळालेली नाही.
पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या ज्या-ज्या वेळी आढावा बैठका होतात, त्यावेळी जुने २५ टक्के अनुदान आणि नवीन अनुदान मिळावा, अशी मागणी केली आहे. सध्याचे अनुदान कमी पडत असल्याने वाढीव अनुदानाचीही मागणी केली आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्यानुसार यात्रा सोहळ्याचे नियोजन तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून सुरू आहे.
या ग्रामपंचायतींना अद्यापही अनुदान मिळेना
धर्मपुरी, कारुंडे, मोरोची, मांडवे, सदाशिवनगर, पुरुंदावडे, एळीव, पिसेवाडी, खुडूस, विझोरी, उघडेवाडी, तोंडले, दसुर, बोन्डले, माळीनगर, सवतगव्हाण, तांबवे, लवंग, यशवंत नगर, माळखांबी, माळेवाडी, संग्रामनगर (ता. माळशिरस), वाडीकुरोली, आढीव, लक्ष्मी टाकळी, शेवते, पांढरेवाडी, भटुंबरे, रोपळे, देगाव, होळे, कौठाळी, शिरढोण, चिंचोली भोसे, चिंचणी (ता. पंढरपूर), शेटफळ, आष्टी, वाघोली, शिंगोली, कामती खुर्द (ता. मोहोळ) शेंद्री, रावगाव, पाथरी, जामगाव, खांडवी (ता. बार्शी), रिधोरे, परिते, अरण, कुई, कव्हे, लऊळ, वेणेगाव, अकोले बुद्रुक, टेंभुर्णी, रांजणी (ता. माढा), जेऊर, कंदर, शेलगाव वांगी, देवळाली, मुंगशी, बिटरगाव (ता. करमाळा) ब्रह्मपुरी, माचणूर, देगाव (ता. मंगळवेढा) या गावांना प्रत्येकी २ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर आहे, त्यापैकी १ लाख ८७ हजार ५०० रुपये रक्कम मिळाली असून, २५ टक्के अनुदान रक्कम मिळणे बाकी आहे.
या ग्रामपंचायतींना मिळतील प्रत्येकी ९ लाख रुपये
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मुक्कामाच्या गावासाठी १२ लाख रुपये प्रस्तावित केले होते, मात्र त्या ग्रामपंचायतींना ७५ टक्क्यानुसार प्रत्येकी १ लाख रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये वाखरी, भंडीशेगाव, पिराची कुरोली, करकंब, शेगाव दुमाला, गोपाळपूर, गुरसाळे या सहा ग्रामपंचायतींना प्रत्येकी १ लाख, माळशिरस तालुक्यातील वेळापूर, बोरगाव या गावांना प्रत्येकी २ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. तर पालखी मार्गावरील सर्वच ग्रामपंचायतींना प्रत्येकी २.५० हजार रुपये यात्रा अनुदान मंजूर असून त्यापैकी ७५ टक्के रक्कम मिळाली असून उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नाही.
