सांगोला – सध्याच्या राजकारणात कधी काही होईल हे सांगता येत नसले तरी यापुढे दीपक साळुंखे-पाटील यांच्यासोबत मी युती करणार नाही, प्रसंगी राजकारण्यातून संन्यास घेईन, असे विधान केल्याने राजकारणात ‘जय-विरू’ची जोडी फुटल्याचे मानले जात आहे. तथापि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आम्ही महायुती म्हणून एकत्रित लढवणार आहोत, अशी भूमिका शिंदेसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी घेतली असल्याचे शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. सांगोला नगरपरिषद निवडणुकीत युती आघाडीवरून शिंदेसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्यात एकमेकांवर एकेरी भाषेत टीका-टिप्पणी करताना चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहावयास मिळाले. नगरपरिषद नगराध्यक्षपदासह २१ जागांसाठी मतदान पार पडले, भाजप, शिंदेसेनेकडून सदस्य पदाच्या दोन जागा बिनविरोध करून विजयाचा पहिला गुलाल ही उधळला आहे, तर उर्वरित मतमोजणी येत्या दि. २१ रोजी डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे सांगोला तालुक्याचे लक्ष्य आता निकालाकडे लागले असताना माजी आमदार शहाजी बापू पाटील हे मात्र दीपक साळुंखे-पाटील यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे.
दीपक साळुंखे-पाटील काय बोलणार? माजी आमदार शहाजी पाटलांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीत झालेल्या आघाडीबाबत व सांगोला तालुक्यात आगामी होवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय घडामोडीवर म्हणाले, महायुती म्हणून एकत्र येण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगताना महायुतीत भाजपसह शेकापक्षालाही सोबत घेणार आहोत मात्र दीपक साळुंखे-पाटील यांच्याबाबतीत परखडपणे मत मांडून त्यांच्यासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता दीपक साळुंखे-पाटील काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.श्रेयवादावरून कलगीतुरा पार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर माजी आमदार शहाजी पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, ज्येष्ठ नेते बाळासाहेब एरंडे यांनी एकत्रित येऊन सदस्य पदाच्या परस्पर उमेदवाराचे अर्ज माघारी घेऊन प्रभाग क्रमांक -१ मधून शिंदेसेनेच्या राणी माने व प्रभाग क्रमांक-११ मधून भाजप सांगोला शहर विकास आघाडीच्या सुजाता केदार सावंत या दोन जागा बिनविरोध करण्यात यश आले आणि त्यानंतर आजी माजी लोकप्रतिनिधींत श्रेयवादावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे
