मंगळवेढा – मंगळवेढा तालुक्यातील चिकलगी येथील ग्राममहसूल अधिकारी तथा तलाठी बाळासाहेब कृष्णा कुंभार यांना शासकीय कर्तव्यात गंभीर अनियमितता, अतिवृष्टी अनुदान वितरणातील गैरव्यवहार, नागरिकांशी गैरवर्तन आणि नोंद व्यवस्थेत चुकीच्या अंमलबजावणीच्या कारणांवरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तत्काळ निलंबित केले आहे. कुंभार यांनी चिकलगी येथे ग्राममहसूल अधिकारी म्हणून काम करताना अतिवृष्टी अनुदान देताना लाभार्थ्यांना शासन नियमांपेक्षा कमी रक्कम वितरित केली, नागरिकांशी उद्धट वर्तन केले, तसेच तहसीलदारांच्या आदेशांची चुकीची अंमलबजावणी केली. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे त्यांनी नोंद प्रक्रियेत मयत व्यक्तीच्या नावाऐवजी जिवंत व्यक्तीचे नाव कमी केल्याची चूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. याशिवाय वारस नोंद क्रमांक ३२५ नोंदविताना मयत रेवणसिद्ध चनबसू बिरुणगी यांचा मृत्यू दाखला अपलोड न करता नोंद मंडळ अधिकारी मरवडे यांच्याकडे निर्गतीसाठी पाठविण्यात आली. ई-फेरफार प्रकल्पातील नोंदींच्या निपटाऱ्यात त्यांनी जाणीवपूर्वक विलंब करून अडथळे निर्माण केल्याचेही आदेशात नमूद आहे. वरील सर्व प्रकरणांवरून कुंभार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तन नियम १९७९ मधील नियम ३ चा स्पष्ट भंग केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. निलंबनानंतर त्यांचे मुख्यालय तहसील कार्यालय सांगोला असेल आणि मुख्यालय सोडताना तहसीलदारांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
