राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. श्रीनिवास पाटील हे शरद पवारांचे अत्यंत चांगले मित्र आहेत. अजित पवारांनी काकांची साथ सोडल्यानंतर श्रीनिवास पाटील आपल्या मित्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. आता ते अजित पवारांच्या भेटीला पोहोचल्याने पुण्यातील युतीसंदर्भात चर्चा झाल्याचे अंदाज लावले जात आहेत. खासदार श्रीनिवास पाटील अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते. बारामती हॉस्टेलवर अजित पवारांच्या बैठका सुरू असताना श्रीनिवास पाटील तिथे दाखल झाले. यावेळी त्यांनी आपण नातीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलो होतो, यात राजकारण काही नाही असा दावा केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? या प्रश्नावर मात्र त्यांनी हात जोडत बोलणं टाळलं.
पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादीची पहिली बैठक पडली पार
पिंपरी चिंचवड शहरात पवार काका-पुतण्या एकत्र येण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडलं आहे. शहरातील अजित पवार राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची बैठक पार पडली. दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रितरित्या अशी पहिल्यांदाच चर्चा झाली.
सुप्रिया ताईंचा मला काही दिवसांपूर्वी फोन आला होता. तेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये मतविभाजन न करण्याचा अन् शरद पवार गटाच्या स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. असा दावा नाना काटे यांनी केला. काटे आणि गव्हाणे यांनी अजित पवार आणि सुप्रिया ताईंसह वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करतच ही बैठक घेतल्याचं स्पष्ट केलं. या चर्चेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तुतारीच्या चिन्हावर उमेदवार उभे करायचे? की फक्त घड्याळ चिन्हावर लढायचं? केवळ दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी करायची की एकनाथ शिंदे शिवसेनेला सोबत घ्यायचं? भाजप विरोधी लढण्यासाठी यातील कोणतं समीकरण अंतिम करायचं? यावर दोन्ही राष्ट्रवादीने ही पहिल्यांदाच एकत्रितरित्या चर्चा केली.
देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं आहे?
पुण्यात कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा समोरासमोर लढताना दिसेल असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. तसंच शिवसेना शक्यतो सर्व ठिकाणी आमच्यासोबत असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी युती होईल. तर काही ठिकाणी भाजपा-राष्ट्रवादीची युती होतानाही दिसेल. पुण्यात मात्र अजित पवारांची, आमची चर्चा झाली आहे. आम्ही दोघे इथले मोठे पक्ष आहोत. भाजपाने पाच वर्षं पुण्याचा चांगला विकास केला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा समोरासमोर लढताना दिसेल. असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, कोणतीही कटुता नसेल,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितंल आहे.
अजित पवार काय म्हणाले?
निवडणुकीबाबत मुख्यमंत्री म्हणतील ते अंतिम असेल असं सांगत अजित पवारांनीही स्वतंत्र लढण्याला दुजोरा दिला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान चर्चेनंतरच केलं आहे असंही म्हणाले. कोणी एकत्रित आले तरी जनतेच्या मनात असते कोणाला मतदान करायचे आणि कोणाला करायचे नाही असंही ते म्हणाले.
