पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी (दि.१८) ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘ऑर्डर ऑफ ओमान’ (Order of Oman) प्रदान करण्यात आला. ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांनी भारत-ओमान द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यात मोदींच्या योगदानाची दखल घेत हा मान बहाल केला. सध्या पंतप्रधान मोदी हे ओमानच्या दौऱ्यावर आहेत.‘ऑर्डर ऑफ ओमान’ हा सुलतानतर्फे दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान असून यापूर्वी ब्रिटनच्या माजी महाराणी एलिझाबेथ द्वितीय, जपानचे सम्राट अकिहितो, दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला आणि जॉर्डनचे राजा अब्दुल्ला द्वितीय यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया – सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
पंतप्रधान मोदींचा हा दोन दिवसांचा ओमान दौरा त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याचा अंतिम टप्पा होता. याआधी त्यांनी जॉर्डन आणि इथिओपियाला भेट दिली होती. विशेष म्हणजे, ओमानमधील सन्मानाच्या एक दिवस आधीच इथिओपियाने पंतप्रधान मोदींना ‘ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला होता.पंतप्रधान मोदी म्हणाले, “शतकानुशतके आपल्या पूर्वजांमध्ये परस्पर संबंध होते. समुद्री व्यापाराच्या माध्यमातून ते एकमेकांशी जोडले गेले होते. अरबी समुद्राने आपल्या दोन राष्ट्रांमधील दृढ सेतूचे काम केले आहे. हा सन्मान मी भारताच्या जनतेला समर्पित करतो.”
पुढे ते म्हणाले, “मांडवीपासून मस्कतपर्यंत प्रवास करून भारत-ओमान संबंधांची पायाभरणी करणाऱ्या आपल्या पूर्वजांनाही मी हा सन्मान अर्पण करतो. तसेच शतकानुशतके झालेल्या सागरी देवाणघेवाणीतून दोन्ही राष्ट्रांच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सर्व समुद्रवीरांनाही हा सन्मान समर्पित आहे.”
