धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करुन घेतल्यास बीड मध्ये जाऊन उपोषणाला बसणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्धार व्यक्त केला. धनंजय मुंडे यांना मंत्री मंडळात घेणार असल्याच्या चर्चेनंतर सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या नेत्यांना मेसेज केले आहेत. तरीही मंत्रीमंडळात घेतले तर बीड मधे जाऊन उपोषणाला बसणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. यानंतर ओबीसी नेत्यांनी सुप्रिया सुळेंना इशारा दिला आहे.
कोकाटेंच्या अटकेच्या तयारीदरम्यान अमित शाहांची भेट का घेतली? धनंजय मुंडेंनी केलं उघड, म्हणाले ‘विनंती करुन…’
सुप्रियाताई माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मागा, पार्थ पवार प्रकरणात लाडक्या दादांचा राजीनामा मागा ना.. त्यासाठी उपोषण करा ना अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे. मुंडे कुटुंबच्या मागे बीडमधील प्रस्थापित लागले आहेत, याचं नेतृत्व पवार करतात. धनंजय मुंडे यांची मीडिया ट्रायल करून राजीनामा घेतल. तुम्ही बीडमध्ये उपोषण केलात तर आम्ही बारामतीमध्ये करू असा इशारा त्यांनी दिला आहे. धनंजय मुंडेंच्या मागे महाराष्ट्रामधील तमाम ओबीसी समाज लागला आहे. त्याना मंत्रिपद मिळालंच पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.
अमित शाह यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांचं ट्विट
“आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री. अमित भाई शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे; त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली. पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची ही भेट होती,” असं धनंजय मुंडे यांनी एक्सवरुन पोस्ट सांगितलं आहे.
माणिकराव कोकाटेंची खाती काढून घेतली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहून माणिकराव कोकाटेंकडे असणारी काढून घेण्याची शिफारस केली होती. राज्यापालांनी ही शिफारस मान्य केल्याने आता कोकाटेंकडे कोणतंही खातं नसून, बिनखात्याचे मंत्री झाले आहेत.
कोण होणार नवे क्रीडामंत्री
“माननीय देवेंद्र फडणवीसजी, मला तुम्ही 17 डिसेंबर 2025 रोजी लिहिलेलं पत्र प्राप्त झालं आहे ज्यामध्ये तुम्ही माणिकराव कोकाटे यांच्याकडे असणारं क्रीडा आणि तरुण कल्याण, अल्पसंख्यांक विकास खातं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवली जावी. मी या मागणीला मान्यता देत आहे,” असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. म्हणजेच अजित पवार आता राज्याचे नवे क्रीडामंत्री होणार आहेत.
