मुंबई : गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बार अखेर उडाला. महायुतीने विधानसभेप्रमाणेच नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीतही घवघवीत यश मिळवत आपली जादू कायम ठेवली आहे. या निवडणुकीत राज्यात भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. भाजपचे १२९ उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान झाले. शिवसेना शिंदे गटाचे ५८, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ३७ नगराध्यक्ष विजयी झाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला नगरपालिका निवडणुकीत अर्धशतकापर्यंतच मजल मारता आली.
राज्यातील २८८ नगरपालिकांच्या निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा राहिला आहे. २८८ पैकी तब्बल २१३ नगरपालिकांमध्ये थेट नगराध्यक्ष निवडून आणण्यात महायुतीतील घटक पक्षांना यश मिळाले. महायुतीत सर्वाधिक जागांवर विजय मिळवत आपणच मोठा भाऊ असल्याचे भाजपने दाखवून दिले आहे. राज्यातील २४२ नगरपरिषद आणि ४६ नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान झाले. त्याची मतमोजणी रविवार, २१ डिसेंबर रोजी पार पडली. या निकालातही महायुतीला अनपेक्षित यश मिळाले. महाविकास आघाडीचा करिष्मा कुठेच दिसला नाही.
या निवडणुकीत महायुतीने काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवली होती. विदर्भातील १०० नगरपालिकांपैकी भाजपने ५८ ठिकाणी विजय मिळवला. तर, काँग्रेसला २३ ठिकाणी यश मिळाले. शिवसेनेने ८, राष्ट्रवादीने ७ तर इतरांनी ४ जागांवर विजय मिळवला. संपूर्ण विदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला शून्यातून बाहेर येता आले नाही. मराठवाड्यातील ५२ नगरपालिकांपैकी भाजपने सर्वाधिक २५ जागा जिंकल्या. शिवसेना ८, राष्ट्रवादी ६, काँग्रेसला ४, शिवसेना ठाकरे पक्षाला ४ तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला २ ठिकाणी नगराध्यक्षपद मिळविण्यात यश आले. ३ ठिकाणी इतरांनी विजय मिळवला. उत्तर महाराष्ट्रातील ४९ नगरपालिकांपैकी भाजपला सर्वाधिक १८ ठिकाणी आपले नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश मिळाले. शिवसेनेचे ११, राष्ट्रवादीचे ७, काँग्रेसचे ५, शिवसेना ठाकरे पक्षाचे २, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे १ तर ५ ठिकाणी इतरांनी विजय मिळवला.
पश्चिम महाराष्ट्र्रातील ६० नगरपालिकांपैकी सर्वाधिक १९ ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष जिंकले. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १४ नगराध्यक्ष विजयी झाले. काँग्रेसला ३, शिवसेना ठाकरे पक्षाला १ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ३ ठिकाणी तर इतर स्थानिक आघाड्यांना ६ ठिकाणी नगराध्यक्षपद मिळविण्यात यश आले. कोकणातील २७ नगरपालिकांपैकी सर्वाधिक १० ठिकाणी शिवसेनेला यश मिळाले. त्याखालोखाल भाजपला ९, शिवसेना ठाकरे पक्षाला २, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना प्रत्येकी १ तर ४ ठिकाणी इतर स्थानिक आघाड्यांना यश मिळाले.
भाजपचे ३,३२५ नगरसेवक विजयी
राज्यातील २८८ थेट नगराध्यक्ष आणि सुमारे ६ हजार २०० हून अधिक नगरसेवकपदासाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक १२९ नगराध्यक्ष निवडून आले, तर तब्बल ३,३२५ नगरसेवक निवडून आले. २०१७ व त्यानंतर झालेल्या या जागांवरील निवडणुकीत भाजपचे १,६०० नगरसेवक निवडून आले होते. त्यात यंदा जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. शिवसेना पक्षाचे ६९५ नगरसेवक निवडून आले आहेत, तर राष्ट्रवादीचे ३११ नगरसेवक विजयी झाले आहेत. काँग्रेसचे १३०० हून अधिक तर शिवसेना ठाकरे पक्षाचे ३७८ नगरसेवक निवडून आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे १५३ नगरसेवक निवडून आले. इतर स्थानिक आघाडी व अपक्ष असे एकूण १४० नगरसेवक निवडून आले आहेत.
विकासाच्या अजेंड्यावर यश मिळाले – शिंदे
नकली शिवसेना म्हणणाऱ्यांची आकडेवारी सिंगल डिजिटमध्ये राहिली असून, खऱ्या शिवसेनेची ताकद महाराष्ट्रभर वाढली आहे. आज शिवसेना फक्त मुंबई-ठाण्यापुरती मर्यादित नसून चांदा ते बांदा पोहोचली आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील यश हे विकासाच्या अजेंड्यावर मिळाले आहे. शिवसेना हा पक्ष सत्तेसाठी नाही, खुर्चीसाठी नाही, तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. काम करणाऱ्याच्या पाठीशी जनता उभी राहते, याची ही पोचपावती आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पुण्यात अजितदादाच ‘बॉस’; १७ पैकी १० जागांवर विजय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा करिष्मा करत आपली ताकद दाखवून दिली आहे. १७ पैकी तब्बल १० ठिकाणी अजित पवारांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीने बारामती, इंदापूर, भोरसह एकूण १० नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदावर विजय मिळवत पुणे जिल्ह्यात आपणच मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले. भाजपला चारच ठिकाणी यश मिळाले. शिवसेना (शिंदे) पक्षाने चाकण, राजगुरुनगर आणि जुन्नर या त्यांच्या बालेकिल्ल्यात सत्ता राखत प्रतिष्ठा राखली. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला पुणे जिल्ह्यात सात, शिवसेना (ठाकरे) पक्षाला चार आणि काँग्रेसला फक्त लोणावळ्यात तीन जागा मिळाल्या.
नांदेडमध्ये घराणेशाही नाकारली, ६ उमेदवारांचा पराभव
नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी घराणेशाही नाकारली, त्यामुळे भाजपच्या तिकीटावर लढणाऱ्या एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांचा दारूण पराभव झाला आहे. घराणेशाहीला थारा न देता मतदारांनी लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांच्यासहित त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे तसेच भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या एकाच कुटुंबातील सहा जणांना पराभूत व्हावे लागले.
मुनगंटीवारांचा भाजपला घरचा आहेर
चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ११ पैकी ७ नगरपरिषदांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपचे दोन आणि शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्षपदाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. “भाजपने मला मंत्रिपद नाकारले तसेच गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यातून कोणालाही मंत्रिपद दिले नाही. तसेच ज्या पद्धतीने भाजपने बाहेरील पक्षातील नेत्यांसाठी दरवाजे उघडून ठेवले, वाटेल त्याला प्रवेश दिले त्याचा परिणाम मतदारांवर होत आहे. शनिशिंगणापूरनंतर आमचा दुसरा असा पक्ष आहे, जिथे दारे नाहीत. त्यामुळे मतदारांनी या निवडणुकीत आम्हाला नाकारले. त्यामुळे हा पराभव मान्य करतो, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपला घरचा आहेर दिला.
मनसेचे ११ उमेदवार विजयी
नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत मनसेने जोरदार कमबॅक केलेले आहे. मनसेचे एकूण ११ उमेदवार नगरसेवकपदी विजयी झाले आहेत. गुहागर नगरपंचायतीवर कोमल जांगळी या नगरसेवकपदी विजयी झाल्या. अनुराग कोचिरकर (देवरुख), सिद्धेश वेल्हाळ (देवरुख), अक्षय झेपले (देवरुख), संतोष चव्हाण (वडगाव, कोल्हापूर), माधुरी दिलीप धोत्रे (पंढरपूर), स्वाती नागेश चौगुले (गडहिंग्लज), राज पाटील (अचलपूर), दौलत पाटील (हुपरी), वाहेद शेख (रेणापूर, लातूर), साईप्रसाद जटालवर (भोकर), कोमल जागळी (गुहागर) हे मनसेचे उमेदवार विजयी ठरले आहेत.
परळीत भाजप-राष्ट्रवादी युतीचा विजय
नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत बीड जिल्ह्यात महायुतीने विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. परळीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप आणि रिपाइंच्या महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, अंबाजोगाई आणि गेवराईतही भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. या विजयानंतर बोलताना आमदार धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांनी जनतेचे आभार मानत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय – फडणवीस
भाजप हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला, हे पुन्हा अधोरेखित झाले. जवळपास १२९ नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले आहेत. एकूण नगराध्यक्षांपैकी ७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे आहेत. गेल्या २०-२५ वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका मोठा विजय कोणालाच मिळाला नाही, जो आज भाजप आणि महायुतीला मिळाला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला. एकाही व्यक्तीविरोधात, एकाही पक्षाविरोधात, एकाही नेत्याविरोधात बोललो नाही. केवळ विकासावर मते मागितली. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद सर्व लोकांनी दिला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मालवण, कणकवलीत भाऊ नितेशपेक्षा निलेश वरचढ
कोकणातील मालवण आणि कणकवली नगर परिषदांची निवडणूक ही निलेश राणे आणि नितेश राणे या बंधूंमध्ये रंगली. मात्र, निलेश विरुद्ध नितेश या स्पर्धेत निलेश राणे यांनी बाजी मारली आहे. मालवण नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या ममता वराडकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा १०१९ मतांच्या फरकाने पराभव करत विजय संपादन केला. मालवणमध्ये शिवसेना शिंदेंचे १०, भाजपचे ५, आणि शिवसेना ठाकरे गटाचे ५ उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले. कणकवलीत शहर विकास आघाडीचे संदेश पारकर निवडून आले. भाजपच्या समीर नलावडे यांचा पराभव झाला. वेंगुर्ल्यात भाजपचे दिलीप गिरप तर सावंतवाडीमध्ये भाजपचे श्रद्धाराजे भोसले नगराध्यक्षपदी निवडून आले.
शिंदेच्या बालेकिल्ल्यांना भाजपकडून सुरुंग
निवडणुकीआधी भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षांमधील वाद दिल्ली दरबारी गेल्यानंतर आता प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपने मात्र एकनाथ शिंदेंच्या अंबरनाथ आणि बदलापूर या दोन बालेकिल्ल्यांना सुरूंग लावला. बदलापुरात शिंदेंच्या शिवसेनेचे २४ नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्षपदी भाजपच्या रूचिता घोरपडे विजयी झाल्या आणि भाजपचे २२ नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे, त्यांच्या पत्नी तसेच भावाला पराभव पत्करावा लागला. अंबरनाथमध्ये भाजपच्या तेजश्री करंजुले यांनी शिंदे गटाच्या मनीषा वाळेकर यांचा तब्बल सहा हजार मतांच्या फरकाने पराभव करत नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला. अंबरनाथमध्ये भाजपचे १०, शिंदे गटाचे २३, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) चार तर काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आले आहेत.
सौरभ तायडे, सिद्धी वस्त्रे सर्वात तरुण नगराध्यक्ष
सर्वात तरुण नगराध्यक्ष होण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सौरभ विजय तायडे (२१ वर्ष, १० महिने) याने पटकावला. सोलापूरमधील मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे (२२ वर्षे) या राज्यातील सर्वात तरुण महिला नगराध्यक्ष ठरल्या आहेत.
