मोहोळ- राज्यातील प्रमुख तीन महामार्गासह अनेक तीर्थक्षेत्राच्या मध्यवर्ती ठिकाण
असणाऱ्या मोहोळ शहराचे बसस्थानक हे अत्यंत वाईट अवस्थेत असून तेथे कुठल्याही सोयी नाहीत. हे बसस्थानक सुसज्य करण्यात यावे, यासाठी एसटी महामंडळाच्या निधी अंतर्गत १० कोटी रुपये मंजूर करावेत, अशी मागणी आमदार राजू खरे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मोहोळ शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र ६५ हा जात असून मोहोळ येथील एसटी बसस्थानक अंत्यत खराब झाले आहे. त्याठिकाणी कुठल्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. ग्रामीण भागातून सोलापूर, बेंगलोर, हैदराबाद येथे जाणाऱ्या गाड्या मोहोळ डेपोमध्ये थांबा घेऊन पुढील प्रवासासाठी निघत असतात. मोहोळ हे अत्यंत गजबजलेले बसस्थानक असूनही सदर ठिकाणी मागील ७० वर्षांपासून कुठल्याही सुविधा नाहीत. तरी एसटी महामंडळाच्या निधी अंतर्गत नवीन सुसज्य असे एसटी बसस्थानक बांधल्यास एसटी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. या नवीन सुसज्य इमारत बांधकामास १० कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात यावे, अशा आशयाचे पत्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देण्यात आले आहे.
