नवी मुंबई/अकोला – देशातून काँग्रेस मुक्त करणार, अशी घोषणा देणाऱ्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चक्क काँग्रेसशी आणि एआयएमआयएमशी युती करत खळबळ उडवून दिली. या युतीनंतर भाजप बॅकफूटवर गेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत, काँग्रेस आणि एआयएमआयएमशी युती खपवून घेतली जाणार नाही. तसेच भाजपच्या संबंधित स्थानिक नेत्यांवरच कारवाई करणार असल्याची कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे असंगाशी संग केलेल्या या युत्या-आघाड्या कितपत टिकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजपाची कारणे दाखवा नोटीस दरम्यान, अंबरनाथ येथे काँग्रेसशी तर अकोल्यातील अकोट येथे एमआयएमशी युती केल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवून घेणाऱ्या भाजपवर चहूबाजूने टीकेची झोड उठली आहे. स्थानिक पातळीवर झालेल्या या युतीमुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सावध पवित्रा घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अकोट येथे एआयएमआयएमशी युती करणारे विधानसभा आमदार प्रकाश भारसाखळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर ही युती नसून काँग्रेसने भाजपला विकासासाठी समर्थन दिले आहे, तरीही पक्षाचा आदेश आम्हाला मान्य आहे, असे स्पष्टीकरण अंबरनाथमधील भाजप नेते नरेंद्र पवार यांनी दिले. काँग्रेसनेही अंबरनाथमधील काँग्रेस नेते प्रदीप पाटील यांच्यासह १२ नगरसेवकांचे निलंबन केले असून एमआयएमने या युतीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे.
अकोट प्रकरणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.‘काँग्रेस आणि एमआयएमसोबतची युती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, ती युती तोडावी लागेल. जर स्थानिक पातळीवर कोणी अशी युती-आघाडी केली असेल तर ती चुकीची आणि बेशिस्त आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांना इशारा दिला आहे. ‘नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये आपण अकोट नगरपरिषदेत एआयएमआयएमसोबत युती करून भाजपच्या ध्येय धोरणाला सुरुंग लावला आहे. तसेच हे करत असताना कोणालाही विश्वासात न घेता, आपल्या या कृतीतून पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत आपण तातडीने खुलासा करावा’ असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पाठवलेल्या नोटिशीत म्हटले आहे.
अकोट नगरपालिकेत ३५ पैकी ३३ जागांवर निवडणुका पार पडल्या. यात भाजपला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या असून भाजपच्या माया धुळे यांनी नगराध्यक्षपदही पटकावले. मात्र, सभागृहात स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपने सर्वसमावेशक अकोट विकास मंच आघाडी तयार केली. यात भाजपने इतर पक्षांसोबत एमआयएमच्या ५ सदस्यांचाही समावेश केला. या नव्या आघाडीची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडेही करण्यात आली. मात्र एमआयएमसोबत हातमिळवणी करत भाजपच्या राजकारणाचा नवा ‘अकोट पॅटर्न’ राज्यभरात चर्चेत आला. त्यामुळे भाजपवर विरोधकांनी तोंडसुख घेतले. टीका झाल्यानंतर रेश्मा परवीन मोहम्मद अजीम, युसूफ हादिक खान, हन्नान सुलतान शाह, दिलशाद रज्जाक खाँ आणि अफरीन अंजूम शरीफोद्दीन हे एमआयएमचे पाच नगरसेवक भाजपसोबतच्या आघाडीतून बाहेर पडले.
भाजपने शिवसेनेला सारले दूर
अंबरनाथ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे १२ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर काँग्रेस शहरातील तिसरा मोठा पक्ष म्हणून पुढे आला. भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले. तर नगराध्यक्ष पदावरही भाजपच्या तेजश्री करंजुले यांचा विजय झाला. तर शिंदेंची शिवसेना हा २७ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने भाजपकडे निकालानंतर युतीचा हात पुढे केला. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बैठकही घेतली. मात्र त्यानतंरही भाजपने शिवसेनेला युतीपासून दूर ठेवत स्थानिक पातळीवर काँग्रेससोबत युती केली. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यात आले. भाजपचे १६, काँग्रेसचे १२, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४ अशा ३२ नगरसेवकांची मोट बांधत भाजपने मित्रपक्ष शिंदेंच्या शिवसेनेला दूर सारले. त्यामुळे शिवसेनेने संताप व्यक्त केला होता.
दरम्यान, या घडामोडींची प्रदेश कार्यालयाला माहिती न देता झालेल्या युतीची ही बाब पक्षशिस्तीचा भंग करणारी असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी बुधवारी जारी केलेल्या पत्रातून स्पष्ट केले आहे. ही बाब लक्षात घेता, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आल्याचे तसेच त्यांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रदीप पाटील यांच्यासोबत पक्षशिस्त भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांना सुद्धा पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे.
काँग्रेसचे १२ नगरसेवक निलंबित
अंबरनाथ नगर परिषदेत निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या १२ नगरसेवकांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी भाजपा व राष्ट्रवादी सोबत तसा गटही स्थापन केला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली असून, त्यांच्या कार्यकारिणीलाही निलंबित केले आहे.
आमदार प्रकाश भारसाखळे यांना भाजपची नोटीस
अकोला जिल्ह्यात भाजप आणि एमआयएम यांच्यात युती झाली होती. त्यानंतर झालेल्या प्रखर टीकेनंतर भाजप प्रदेशाध्यक्षांनी विधानसभा आमदार प्रकाश भारसाखळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर अकोटमधील भाजपच्या नेतृत्वाखालील ‘अकोट विकास मंचा’तून एमआयएम बाहेर पडले आहे. ‘‘पक्षाची प्रतिमा मलिन झाली, त्यामुळे आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये?” असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पत्रातून विचारले आहे.
