मुंबई -मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महायुती, मनसे, ठाकरे सेनेच्या सभा शिवाजी पार्क मैदानात होणार आहेत. मनसे व ठाकरे सेनेची ११ जानेवारी, तर भाजप व शिंदे सेनेची १२ जानेवारीला सभा होणार आहे. मुंबई महानगरपालिका काबीज करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून ठाकरे बंधू कोणाचे वाभाडे काढणार, तर भाजप-शिंदे सेना कोणावर टीकास्त्र सोडणार, याकडे सगळ्या राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने सभेसाठी रितसर परवानगी दिल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
राजकीय सभांसाठी शिवाजी पार्क मैदानाला सर्वच राजकीय पक्षांकडून पसंती दिली जाते. ठाकरे आणि शिवाजी पार्क मैदान ५६ वर्षांपासूनचे जुने नाते आहे. दसरा मेळावा, राजकीय सभांसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ होत असे. निवडणूक काळातही शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये वादावादी होत असे. अखेर ज्या पक्षाचा अर्ज आधी त्याला मैदान मिळते.
चारही पक्षांची चढाओढ
मुंबई महापालिका प्रचारसभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, यासाठी शिवसेना (ठाकरे), मनसे, भाजप, शिवसेना (शिंदे) या चारही पक्षांनी महापालिकडे अर्ज केले होते. पालिकेने या चारही पक्षांना ११ व १२ जानेवारी सभांसाठी परवानगी दिली आहे. ठाकरे बंधूंची ११ जानेवारीला व शिवसेना-भाजप महायुती यांची १२ जानेवारीला एकत्रित सभा होणार आहे. त्यामुळे मुंबईत या दोन्ही दिवशी या पक्षांच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. हे दोन्ही गट निवडणुकीत आमनेसामने येणार आहेत. शिवाय शिवसेना (ठाकरे) व मनसे प्रथमच एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. या दोन्ही पक्षांच्या सभा एकत्रित होणार आहे तसेच शिवसेना-भाजपची (महायुती) एकत्रित सभा होणार आहे. त्यामुळे चारही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
सभांसाठी जोरदार तयारी
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या सभांसाठी प्रत्येक पक्षांने नियोजन केले आहे. शिवसेना व मनसे यांच्या अनेक सभा शिवाजी पार्कवर गाजल्या आहेत. यावेळी शिवसेना-मनसे एकत्र आल्याने एकत्र सभा होणार आहेत. या सभांसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
