पंढरपूर-आषाढ शुद्ध एकादशीचा सोहळा ६ जुलै रोजी होणार आहे. आषाढी यात्रा सोहळ्याच्या अनुषंगाने यापूर्वी पालखी मार्ग, तळ व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुखांकडून काही मागण्या व सूचना केल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच, नवीन सूचना व मागण्या प्राप्त झाल्या असून, त्या सर्व मागणीची पूर्तता पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत दहा मानाच्या पालख्यांचे विश्वस्त, अध्यक्ष, सचिव यांच्याबरोबर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता संजय माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव उपस्थित होते.
यावर्षी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने पावसामुळे कोणत्याही प्रकारची आपत्ती येऊ शकते. कोणत्याही अडचणी निर्माणहोण्याची शक्यता आहे. या गोष्टी गृहीत धरून भाविकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांतर्गत व्यवस्थापनाचे नियोजन केले आहे.
पालख्यांना पंढरपुरात दाखल होण्यास होतो उशीर
सर्व पालखी सोहळे वाखरी येथे दाखल झाल्यानंतर सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वागत कक्ष उभारले जातात. स्वागताचे कार्यक्रम घेतल्याने पालखी सोहळे पंढरपुरात दाखल होण्यास उशीर होतो. यासाठी स्वागत कक्षांची संख्या कमी करावी, जेणेकरून पालखी सोहळे लवकर पंढरपुरात दाखल होतील.
