सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेकांना विश्वास बसणार नाही असा गंभीर प्रकार सोलापूर ग्रामीण पोलिसांनी उघड केला आहे. सोलापूर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणे किंवा तपासणी करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या वेळेस अतिशय धक्कादायक पद्धतीने गर्भलिंग निदान होत असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे.
एखाद्या शेतात कार पार्क करुन…
बार्शी तालुक्यातील जामगाव शिवारामध्ये एका आलिशान कारमध्ये सुरू असणाऱ्या लिंगनिदान केंद्रावर पोलिसांनी धाड टाकली आहे. अत्यंत शिस्तीत आणि शांततेत चालणाऱ्या गर्भलिंग निदान केंद्रावर धाड टाकत पोलिसांनी एका बोगस डॉक्टराला अटक केलीय. बार्शी तालुक्यामध्ये चालत्या फिरत्या आलिशान कारमधून एखाद्या शेतात कार पार्किंग करत गर्भलिंग निदान करण्यात येत होते. हे बेकायदा गर्भपात केंद्र बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी उघडकीस आणल्या असून 18 लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
पहाटे पावणे पाचच्या सुमारास…
पोलिसांनी पहाटे पावणे पाचच्या सुमारास जामगाव शिवारातील वानेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पडीक शेतात ही आलिशान कार पकडली आहे. सदरच्या कारमधून दोन काळ्या पिशव्यांची झडती घेतली असता हा प्रकार उघडकीस आलाय. बार्शी ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यामध्ये तीन लाख रुपयांची झोन केअर चालू स्थितीतील पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि प्रोब आढळले आहेत. त्यासोबतच गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टोल या प्रतिबंधित 144 सीलबंद गोळ्या सापडल्या आहेत. यासोबतच गर्भपातासाठी वापरलेल्या गोळ्यांची तब्बल 51 रिकामी पाकिटे आणि रक्त लागलेले गर्भपाताचे साहित्य तेथे सापडले आहे.
चालतं फिरतं पाप
हादरवून टाकणारी बाब म्हणजे हा विषय इतक्यावरच न थांबता रक्तस्त्राव थांबवण्याचे इंजेक्शन, सलाईनच्या बाटल्या, ग्लोव्हज असे वैद्यकीय साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि खोबऱ्यांच्या माहितीनुसार ही मोठी कारवाई केली असून चालतं फिरतं पाप पोलिसांनी उघड केलं आहे. आलिशान कार, लिंगनिदान केंद्र, लिंग निदानाचे साहित्य आणि एक बोगस डॉक्टर सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांनी जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या बाहेर आणखी कोणकोणते कारनामे केलेले आहेत, याचा शोध घेत आहेत. यासोबतच याचं आंतरराज्य टोळीशी काही संबंध आहे का याचा कसून तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र बोगस डॉक्टराच्या या चालाखी धंद्यामुळे आत्तापर्यंत किती निष्पापांचे बळी गेले आहेत हे देव आणि हा राक्षसरुपी बोगस डॉक्टरच जाणो. डॉक्टरांचा हा गोरख धंदा उघड झाल्यानंतर पोलीस देखील चांगलेच चक्रावले आहेत. या बोगस डॉक्टर सोबतच सदरच्या प्रकरणात आणखी कोणी आरोपी सापडतात का हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
