भारताच्या कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या भिकेला लागली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर जागतिक संस्थांकडून कोट्यवधी डॉलर्सची आर्थिक मदत मिळत असूनही, पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. महागाईच्या भयंकर परिणामामुळे लोकांना दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागत आहे. पाकिस्तानमधील ही वाढती गरिबी जागतिक बँकेच्या नवीन अहवालाने उघड केली आहे.या अहवालात गरिबी वाढण्याचे प्रमुख कारणही दिले आहे. विशेष म्हणजे, जागतिक बँकेकडून जून महिन्यात पाकिस्तानसाठी २० अब्जडॉलर्सची रक्कम मंजूर होण्याची चर्चा सुरू असतानाच हा अहवाल समोर आला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासोबतच्या वाढलेल्या तणावादरम्यान हे जगभरात स्पष्ट झाले आणि जागतिक बँकेलाही याची गंभीर दखल घ्यावी लागली. त्यामुळे, पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त आर्थिक मदतीसह बेलआउट (बेलआउट पॅकेज) मंजूर झाल्यानंतर लगेचच, ११ नवीन अटी लादल्या गेल्या, ज्यामुळे पाकिस्तानवर आणखी आर्थिक दबाव वाढला. सध्या पाकिस्तानवर तब्बल १३१ अब्ज डॉलर्सचे बाह्य कर्ज आहे, जे त्याच्या एकूण जीडीपीच्या सुमारे ४२ टक्के आहे. तर, देशातील लोक महागाई, उपासमार आणि बेरोजगारीने त्रस्त आहेत.
