मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
पंढरपूर – गेल्या ७ ते ८ वर्षापासून सध्याची मंदिर समितीची कार्यकारिणी कार्यरत आहे. सध्या मुख्य अध्यक्ष नसून सहअध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मनमानी कारभार चालू आहे. ही मंदिर समिती बरखास्त करण्यात यावी, या मागणीसाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
भाविकांना सोयीचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहे. भाविकांसाठी टोकन दर्शन नाही. मोफत हॉस्पिटल उभा करणे असेल. दर्शन रांगेमध्ये कायमस्वरूपी सुविधा नाही. प्रश्नावर लक्ष न देता, ठेकेदारीवर मात्र सहअध्यक्ष आणि समिती सदस्यांचे बारीक लक्ष आहे. मंदिरातील सुरक्षारक्षकाचे टेंडर हे गेल्या वर्षी चार कोटींचे होते. तेच टेंडर चालू वर्षी ५ कोटी ७७ लाख रुपयाला काढले आहे. बीव्हीजी कंपनीशी हातमिळवणी करून, हे टेंडर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नियमावली तयार करून त्यांना देण्यात आले आहे. बीव्हीजी कंपनीबद्दल अनेक तीर्थक्षेत्रांवर तक्रारी असून, काही ठिकाणी काळ्या यादीत त्यांचे नाव आहे. असे अनेक गैरप्रकार मंदिर समितीचे सहअध्यक्ष आणि सदस्य करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही समिती लवकर बरखास्त करावी. यासाठी दत्ता काळे यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, मनसेचे संतोष कवडे, शैलेश घोगरदरे, तात्या जगताप, स्वप्निल गायकवाड उपस्थित होते.
मंदिर समितीकडून निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्यांना पत्र
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर येथील आउटसोर्सिंग पद्धतीने कुशल आणि अकुशल मनुष्यबळ, कर्मचारी पुरवठा कामाची ई-निविदा बीव्हीजी इंडिया लि. पुणे यांना जाहीर झाल्यानंतर, आपण त्यांच्याविरुद्ध सादर केलेली निवेदने या कार्यालयास प्राप्त झालेली आहेत. या निवेदनासोबत आपण कोणत्याही स्वरूपाचा पुरावा सादर केलेला नाही. निवेदनातील मुद्द्यांच्या अनुषंगाने पुरावे सादर करावेत, असे लेखी पत्र मंदिर समितीच्या वतीने देण्यात आले होते.
या संघटनांनी दिले निवेदन
मंदिर समितीच्या विरोधात शिवक्रांती युवा संघटन, मनसे, शिवस्वराज्य युवा संघटना, अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना, अखिल भारतीय छाया मराठा युवा संघटना, संभाजी बिग्रेड या संघटनानी निवेदन दिले होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करा, या मागणीसाठी उपोषण करताना दत्ता काळे. त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले.
