कुडूवाडी – फनरेप फनगेम चक्री नावाचे बनावट ॲप तयार करून एजंटांकरवी याचा प्रसार करून फिर्यादीसह एकूण ७जणांची सुमारे १ कोटी ४८ लाखांची फसवणूक झाली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या फसवणुकीत २१ आरोपींची नावे समोर आली आहेत. एजंट अरोपींना बॅलन्स सोडल्यावर २० टक्के कमिशन मिळत होते. आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. ही घटना लऊळ गावासह कुईवाडी, बार्शी शहरासह परिसरात घडली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी बालाजी विष्णू खारे रा. लऊळ (ता. माढा) याने १२ फेब्रुवारी २०२५ रोजी फनरेप चक्री गेममध्ये फसवणूक झाली असल्याची फिर्याद कुडूवाडी पोलिस ठाण्यात दिली होती. यामध्ये सपोनी शिंदे यांनी चार आरोपींना अटक केली होती. त्यानंतर गुन्ह्याची व्याप्ती पाहत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने पुढील तपास हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेने आजपर्यंत केलेल्या तपासामध्ये आरोपींनी कटकारस्थान रचून मागील दोन वर्षापासून बनावट ॲप तयार करून एकूण ७ गुंतवणूकदारांना फसविल्याचे समोर आले आहे. यामध्ये फसवणुकीतील रक्कम व आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यातील दोन आरोपी बार्शी व उर्वरित आरोपी कुहूवाडी शहर व परिसरातील आहेत. संबंधित आरोपींकडून पीडित गुंतवणूकदारांना यूट्युबवरील फनरेप रोलेट विनिंग व्हिडिओचा डेमो दाखवूनचे अकाउंटवर लिंक पाठवून खाते ओपन करत होते. सदर आरोपींकडून फसवणूक झालेल्या लोकांना फनरेप ऑनलाइन चक्री गेममध्ये बॅलन्स घेतल्यानंतर प्रत्येकवेळी युजर आयडी व पासवर्ड बदलून दिला जायचा. सदर गुन्हा हा संघटित गुन्हेगारी स्वरूपाचा असून आरोपींनी फसवणुकीच्या रकमा साखळी पद्धतीने एकमेकांच्या खात्यावर वळवल्या आहेत. सदर गुन्ह्याचे स्वरूप हे व्यापक असून याबाबत बाहेरील जिल्ह्यात जाऊन पुढील तपास पोलिस करणार आहेत. गुन्ह्यातील आरोपी व त्याची व्याप्ती आणखी वाढणार आहे.
नितीन पाटमस, रणजित सुतार, वैभव सुतार, अमित शिंदे, स्वप्निल नागटिळक, राहुल चौथे उर्फ बच्चू भिसे, सूरज किरवे, फनरेप फनगेम कंपनीचे मालक, फनरेप फनगेम कंपनीचे डिस्ट्रीब्युटर, अमरदीप पंचिरे, सौरभउर्फ बप्पा देवकते, सागर तरंगे, अरबाज दाळवाले, साहिल दाळवाले, अर्जुन गायकवाड, अरबाज पठाण, सागर मोरे, मिलन गोफणे, सोनू राजगे (सर्व रा. कुडूवाडी ता. माढा), योगेश गाडे, गणेश देवकते (दोघे रा.ता. बार्शी) अशी एकूण २१ आरोपींची नावे आहेत २० टक्के कमिशन एजंट आरोपींना बॅलन्स सोडल्यानंतर मिळत होते. आत्तापर्यंत ८ जणांना अटक केली असून उर्वरीत आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले.
