तुळजापूर येथील श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी १ हजार ८६५ कोटी रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्या बाबतचा शासननिर्णयही आज जारी करण्यात आला. धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांवर या आराखड्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अष्टविनायकातील मोरगाव, थेऊर, ओझर, रांजणगाव, महड, पाली, सिद्धटेक मंदिरांचा व परिसराचा, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा मंदिर, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे चौंडी येथील स्मृतीस्थळाचाही विकास केला जाणार असून, त्यांच्याही आराखड्याना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून श्री तुळजाभवानी देवीला महत्त्व आहे. देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान तुळजापूर येथे आहे. देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक मोठ्या संख्येने येत असतात. नवरात्रीच्या काळात मंदिरात मोठा उत्सव, भक्तांची गर्दी असते. ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या तुळजाभवानी देवस्थानच्या विकासाचा मनोदय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात व्यक्त केला होता.
स्थानिक पातळीवरील सर्व संबंधितांशी चर्चा करून श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा व लागणारा निधी याचा आराखडा धाराशिवचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने तयार केला आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून ६ मे २०२५ रोजी चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता घेण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यातच या आराखड्यास प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय नियोजन विभागाने जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार विकास आराखड्यातील कामे करताना ऐतिहासिक वास्तूंची मूळ शैली जपण्याचे तसेच पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थांकडून ही कामे करून घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले.
