पंढरपूर- पंढरपूरची आषाढी वारी ही राज्याचे वैभव वाढविणारी परंपरा आहे. यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांना फिरती शौचालये, पाणी, आरोग्य आणि पोलिस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. ही वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावर्षीही वारीत सामील होणाऱ्या वारकऱ्यांसाठी समूह विमा योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, वारीचे योग्य नियोजन करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आयुक्तांनी पालख्यांच्या स्वागतासाठी वेगळी व्यवस्था करावी. रस्त्याच्या बाजूला मंडप टाकून स्वागत करावे. मात्र, पालख्यांना विलंब होवू नये, याची दक्षता घ्यावी राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याने वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी पालखी मुक्काच्या ठिकाणी ३६ वॉटर प्रूफ मंडपाची तयारी केली आहे. आवश्यकता भासल्यास आणखी वॉटर प्रूफ मंडप वाढविण्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यातील विविध भागांतून पालख्या पंढरपूरला येतात. नाशिक, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणाहून येणाऱ्या पालख्यांना पालखी मार्गात सोयी-सुविधा देण्यासाठी नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी समन्वयांनी बैठक घेवून उपाययोजना कराव्यात. आपापल्या जिल्ह्यातून पालख्या जाताना स्थानिक प्रशासनाने रस्ते, पाणी, वीज, पोलिस बंदोबस्त, आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी तात्काळ बैठका घेवून नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
पोलिस महासंचालक यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय करून पालख्यांच्या बंदोबस्ताची, वाहतूक, अपघात होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कोणतीही पालखी, दिंडी पोलिसांविना राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.
वाखरीत होणार मॉडेल वारकरी तळ
सर्व संतांच्या मानाच्या पालख्या वाखरीजवळ एकत्र येतात. राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पायी पंढरीची वाट चालत असताना पालख्यांच्या स्वागतासाठी संत नामदेव महाराजांची पालखी वाखरी येथे जाते. यामुळे या ठिकाणी पालख्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी योग्य नियोजन करून दक्षता घ्यावी. येथे गर्दी लक्षात घेवून वाखरीचे विशिष्ट मॉडेल वारकरी तळ होण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
महिलांसाठी हिकरणी कक्ष
वारीत प्रयागराजच्या धर्तीवर महिलाचाही विचार करण्यात आला. हिरकणी कक्षासह महिलांना स्नानासाठी वेगळी स्रानगृहांची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
