सोलापूर विमानतळावर बुधवारी दि. 28 मे रोजी आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने मॉकड्रिल घेण्यात आली. सोलापूर ते गोवा विमान सेवा काही दिवसात सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची चाचणी या निमित्ताने घेण्यात आली. विमानतळावर दहशतवादी हल्ला झाल्यास कशाप्रकारे त्याचा सामना करावा याची माहिती यावेळी पोलिसांना व विमानतळावरील सुरक्षारक्षकांना देऊन त्यांच्याकडून चाचणी घेण्यात आली. अधिक माहिती देताना एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी अतिरेकी कारवायांना पाय बंद करण्याच्या हिशोबाने पोलिसांची व संबंधित सर्व पथकांची किती तयारी आहे याची चाचणी या रंगीत तालमीतून घेण्यात आली. सोलापूर विमानतळावरील आमची यंत्रणा किती सज्ज आहे याचीही पाहणी करण्याचा त्यात हेतू होता. या रंगीत तालमीत पोलिसांसह विमानतळातील सुरक्षा कर्मचारी, डीसीपी, आयबीचे कर्मचारी, दहशतवाद विरोधी पथकाचे कर्मचारी आदींचाही समावेश होता. चाचणीत पोलिस, विमानतळातील सुरक्षा रक्षक व अन्य सहकाऱ्यांनी योग्य समन्वय राखत चांगली कामगिरी केली असे सांगितले.
