रविवारी (दि. २५) बारामती शहर आणि परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करीत बारामतीत पोहोचले. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे, त्यांना दहा हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याची पाहणी करून पंचनामे सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बारामती परिसरात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पिंपळी परिसरात नीरा डावा कालवा फुटल्याने अनेक घरात व शेतात पाणी जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले. सोमवारी (दि. २६) इंदापूर तालुक्याचा पाहणी दौरा करीत नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पवार यांनी गुरुवारी (दि. २९) पाहणी दौरा केला. पवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या.
