फक्त राज्यातच नव्हे, तर गेल्या 48 तासांसाठी देशातील हवामानाचा आढावा घेतल्यास बहुतांश भागांमध्ये सातत्यानं काही बदल झाल्याचं दिसून आलं. त्यातच बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या शक्ती या चक्रीवादळानं वाऱ्यांची दिशा बदलल्यानं कमीजास्त स्वरुपात त्याचा थेट परिणाम राज्यातील हवामानावरही होताना दिसत आहे. या चक्रीवादळाच्या धर्तीवर पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेश इथं जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, महाराष्ट्राच्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबई क्षेत्रावर पूर्वमोसमी वारे आणि वादळी पावसाचा प्रभाव दिसून येत आहे.
रायगडला पावसाचा यलो अलर्ट
पुढील 48 तासांसाठी अर्थात 18 मे पर्यंत रायगड जिल्ग्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला असून, यादरम्यान ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार यादरम्यान ढगांच्या गडगडाटासह वीजा चमकण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. विजा चमकत असताना घराबाहेर पडू नका, मोबाईलचा वापर टाळा, इलेक्ट्रिक उपकरणांपासून दूर रहा असा इशारा जारी करण्यात आला आहे.