नेपाळ बॉर्डरवरून घेतले ताब्यात वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण हा गेल्या १० दिवसांपासून फरार होता. निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार पथके तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही शोध घेत होती. अखेर पोलिसांना निलेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात यश आले आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबियांसह निलेश चव्हाणला बावधन पोलिसांनी सहआरोपी केले आहे. तर वारजे पोलिसांनी वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला. निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद असलेल्या करिष्मा हगवणेचा मित्र आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण हा अटक होण्याआधीच फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष पथकांची स्थापना केली होती. अखेर चव्हाण पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तो महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा राज्यांतून तो नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.
अतिशय चांगली कारवाई : मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलिसांनी अतिशय चांगली कारवाई केली आहे. नेपाळला पळून जाण्याची तयारी होती परंतु पोलिसांनी बॉर्डरवरच त्याला अटक केली आहे. योग्य प्रकारचे इंटेलिजेंस प्राप्त करून हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला. त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितले होते की या प्रकरणात जेवढे कोणी लोक असतील कोणालाही सोडले जाणार नाही, कुठलीही हयगय केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशी शिक्षा झालीच पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार आहे.
