कोव्हिड -१९ विषाणूने पुन्हा एकदा भारतात शिरकाव केला असून, देशातील अनेक राज्यांमध्ये संसर्गाच्या संख्येत आणि मृत्यूंमध्ये वाढ होताना दिसत आहे. सध्या भारतात १,२५२ सक्रिय कोविड रुग्ण आहेत आणि एकूण १३ मृत्यूंची नोंद झाली आहे. चीन, हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या देशांतील रुग्णसंख्येत झालेल्या वाढीनंतर भारतातही या विषाणूचे नवे उपप्रकार झपाट्याने पसरत आहेत. जेएन. १, एनबी.१.८.१, एलएफ.७ आणि एक्सएफजी हे आमिक्रॉनचे उपप्रकार असून त्यांचा संसर्ग वेगाने होत आहे. मात्र, बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणे सौम्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
राजस्थानमध्ये गुरुवारी १५ नवे रुग्ण सापडले असून त्यापैकी ९ रुग्ण जयपूरमध्ये आढळले. उर्वरित प्रकरणे जोधपूर (२) आणि उदयपूर (४) येथे नोंदवली गेली. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तपासलेल्या नमुन्यांमधून एक्सएफजी आणि एलएफ.७.९ प्रकारांची उपस्थिती निष्पन्न झाली आहे. हे प्रकार सध्या प्रामुख्याने पश्चिम व दक्षिण भारतात आढळून येत आहेत. कर्नाटकातील एका ७० वर्षीय व्यक्तीचा एन्सेफॅलोपॅथी आणि इतर आजारांमुळे मृत्यू झाला, तर चंदीगडमधील सरकारी रुग्णालयात एका ४० वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर यांनी राज्यांना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन आणि औषधांची उपलब्धता सुनिश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर आणि उच्च जोखमीच्या गटासाठी बूस्टर डोस देणे यावर भर दिला.
