पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी सरकारकडून राज्य यंदाही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वारकऱ्यांच्य सेवेसाठी सरकारने विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. विशेषतः वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला गेला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही ही सुविधा लागू असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस देवेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत वारीबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. वारीच्या मार्गावर कुठेही रस्ते खराब असू नयेत यासाठी योग्य डागडुजी, मुरूम, खडी व डांबरीकरण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
वारकऱ्यांसाठी संरक्षण, आरोग्य आणि सुविधा
यंदाच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी समूह विमा योजना राबवली जाणार आहे. तसेच, आरोग्य विभागाकडून आरोग्य शिबिरं, कार्डियाक अँम्ब्युलन्स, तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर स्वतः पंढरपूर येथे भेट देऊन या सुविधांचा आढावा घेणार आहेत. वारीदरम्यान पोलिसांसोबत समन्वय राखण्यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येणार आहे. वीज, पाणी, वॉटरप्रूफ तंबू यांसारख्या सुविधा पालखी तळांवर पुरवण्यात येतील. वारकऱ्यांचे भोजन आणि पारंपरिक सोपस्कार वेळेत पार पडण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे.
