माळशिरस -तालुक्यात दि. ३० जून रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा, तर दि. १ जुलै रोजी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रवेश करीत असून, पावसाचे दिवस असल्याने यावर्षी प्रथमच पावसासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारणार असल्याची सूचना देण्यात आल्या आहेत. दोन प्रमुख पालख्यांचा ८० किमी प्रवास होणार असून, पाच मुक्काम आहेत. या पालखी तळ, विसावा, मार्गावर एकूण १ लाख ७हजार ५०० चौ. फुटाचा वॉटरप्रुफ मंडपाची उभारणी केली जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माळशिरस पंचायत समिती येथील सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत बोलताना दिली.यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, स्मिता पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, अमोल जाधव, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, संजय धनशेट्टी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी., आबासाहेब पवार गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
या मुद्द्यांवर भर
पालखी तळ, तळाच्यानजीकच्या सात रस्त्यांनी दुरुस्ती, १३ रस्त्यावरील खड्डे बुजविणे, बाजू पट्टीवरील झाडे-झुडपे काढणे, बाजू पट्टया मुरुमाने भरणे, पालखी तळावरील अतिक्रमण, कचरा काढणे, सोहळ्यात २५ ग्रामपंचायतींचा सहभाग, स्वच्छता, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी आधी प्राथमिक व्यवस्था होणार, मार्गावर गरजेनुसार प्लॅस्टिक संकलन केंद्र, वृक्षलागवड करून हरित वारी, निर्मल वारीसाठी विशेष प्रयत्न असून, वैयक्तिक शौचालयांना वापरासाठी आवाहन, वैद्यकीय सेवा पुरवणारे कक्ष, महिलांसाठी हिरकणी कक्ष, पाणी उगमांचे निर्जंतुकीकरण होणार आहे.
