लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या ‘सरकारी नोकरदार’ महिला रडारवर
‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी नोकरदार महिलांकडून वसुली केली जात आहे. पडताळणीत असे दिसून आले की, शासकीय नोकरदार महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. आता लाभ घेणाऱ्या महिलांवर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३१ मे रोजी दिला आहे.दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अर्ज केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना त्याचा लाभ देण्यात आला होता. महायुतीचे सरकार पुन्हा स्थानापन्न झाल्यानंतर या योजनेची शहानिशा करण्याचे ठरवण्यात आले. सुरुवातीला सरकारने कोणावर कारवाई करणार नाही, थकबाकी वसूल करणार नाही असे जाहीर केले होते. बावनकुळे म्हणाले, दीड हजार रुपये महिन्यासाठी सरकारी सेवेत असलेल्या महिलांनी असे करायला नको होते. कोणी लाभ घेतला असेल तर तो परत करायला हवा. शासनामार्फत वसुली केली जाणारच आहे. काही खात्यांनी याची चौकशी सुरू केली आहे. लाडकी बहीण योजना गोरगरीब बेरोजगार महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. यानंतरही शासकीय कर्मचारी याचा लाभ घेणार असतील तर कारवाई निश्चित आहे असेही बावनकुळे यांनी ठणकावून सांगितले.
जानेवारी-फेब्रुवारीतच लक्षात आले : तटकरे
याबद्दल महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीच ट्विट करत माहिती दिली. लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास २ लाख अर्जाची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे २२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याचे जानेवारी-फेब्रुवारीतच लक्षात आले. तेव्हापासून या महिला कर्मचाऱ्यांच्या खात्यात महिना हप्ता जमा केलेला नाही, असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
उत्पन्न पात्र मयदिपेक्षा जास्त
या योजनेत २१ ते ६५ वर्ष वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना दरमहा १,५०० रुपये मदत दिली जाते. सरकारी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असते. त्यामुळे ते या योजनेस पात्र नाहीत. तरीही, अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणतीही तपासणी न करता या योजनेचा लाभ घेतला.
