महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यात ८४ नवीन कोविड रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मुंबई (३२), पुणे महापालिका (१९), ठाणे महापालिका (१४), पिंपरी-चिंचवड (३), तसेच इतर काही जिल्ह्यांचा समावेश आहे. जानेवारीपासून एकट्या मुंबईत ४११ रुग्ण नोंदवले गेले आहेत. यापैकी मे महिन्यात सर्वाधिक म्हणजेच ४०५ रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत ४६७ रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण ७ मृत्यू कोविडशी संबंधित असून हे रुग्ण आधीपासूनच विविध गंभीर आजारांनी ग्रस्त होते. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये काहींना मूत्रपिंड विकार, मेंदूविकार, मधुमेह, फुफ्फुसाचे विकार आणि इतर सहव्याधी होत्या. कोविडचे रुग्ण तुरळक प्रमाणात आढळत असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तर, जानेवारी २०२५ पासून राज्यभरात एकूण १०,३२४ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ६८१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.
