पंढरपूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम पार पडले.
पंढरपूर येथे मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती मंडळाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पुष्पहार घालून घोंगडी, काठी घेऊन सन्मान करण्यात आला.
दरम्यान या कार्यक्रमास माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, आमदार बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित राहून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील धनगर समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते नाना खांडेकर यांनी जयंती दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती देऊन रविवारी पंढरपुरात निघणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मिरवणुकीसाठी धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
