आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत आपल्या पक्षाला सर्वाधिक यश मिळावे, यासाठी प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे या चर्चा सुरू असतानाच आज शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या तीन दिग्गज नेत्यांची एकत्र आणि बंद दाराआड बैठक झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पुन्हा उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत पुन्हा खलबते सुरू असल्याची चर्चा आहे. उपमुख्मंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्ष सत्तेत आहे दरम्यान, पुण्यात साखर संकुलात आज महत्त्वाची बैठक पार पडली. कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना काय फायदा होईल, याबाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला अजित पवार, शरद पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह इतर नेतेदेखील उपस्थित होते. पण या बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे.
प्रमुख तीन नेत्यांत बंददाराआड चर्चा ?
साखर संकुलाकील बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील वगळता सर्व नेते बैठकीतून बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. केवळ शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील बैठकीच्या रुममध्ये बसून होते. या वेळी तीनही नेत्यांमध्ये बंद दाराआड बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण या बैठकीची टायमिंग महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे.
तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्ष महाविकास आघाडीत आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला चांगले यश मिळाले. पण शरद पवारांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा असून, तशा हालचाली वाढल्याचेही बोलले जात आहे.
