पंढरपूर – तंबाखू विसर्जन दिवस हा दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या दिवशी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याचे नकारात्मक परिणाम याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम चालवली जाते. या दिवसाला जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून देखील ओळखले जाते. या दिनाचे औचित्य साधून पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे गेली पंधरा वर्षापासून ३१ मे हा दिवस तंबाखू विसर्जन दिवस म्हणून पाळला जातो. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी तंबाखू विसर्जन दिन साजरा करण्यात आला तसेच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना उद्योजक दत्ता बागल म्हणाले की तंबाखू सेवनामुळे होणारी शरीराची हानी रोखण्यासाठी आणि भावी पिढी व्यसनापासून दूर राहावी या उद्देशाने पंधरा वर्षापासून जवळपास ५०० नागरिक तंबाखू व्यसनापासून मुक्त झाले असून यावर्षी अनेक नागरिकांनी तंबाखू सोडण्याचा संकल्प केला आहे. पुढील वर्षी व्यसनमुक्तीचा संकल्प करणाऱ्या नागरिकांचा सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम घेऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती दत्ता बागल यांनी दिली. याप्रसंगी उपस्थित नागरिकांना अनिल बागल, गणपत मोरे, सुभाष बागल, दत्ता बागल यांनी मार्गदर्शन करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, माजी सरपंच बालाजी बागल, शेतकरी संघटनेचे नेते समाधान फाटे, भानुदास पवार, विपुल कोळी, गणेश बागल, बाळासाहेब बागल, राजेंद्र मस्के, रवींद्र पाटील, सचिन बागल, प्रशांत पाटील, वैभव केदार, वाल्मीक कोळी, पोपट बागल, ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे, सदाशिव चव्हाण, बापूराव शिंदे, बाळासाहेब वाघमारे, अण्णासाहेब भोसले, जैनुद्दीन मुलानी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
