भारत-पाकिस्तानमधील लष्करी तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. सिंगापूरमधील शांग्री-ला संवाद परिषद २०२५ मध्ये भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान आणि पाकिस्तानचे जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा आमनेसामने भिडले.
दोघांमधील परस्पर आरोप-प्रत्यारोपांनी भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाची झलक पाहायला मिळाली. या परिषदेत दोन्ही देशांच्या लष्कर प्रमुखांनी परस्पर धोरणांवर कठोर शब्दांत भाष्य केले. यावेळी जनरल अनिल चौहान यांनी ‘रेडलाईन’ ओलांडू नका, पाकिस्तानबाबत सहनशीलता संपली आहे, अशा शब्दांत पाकिस्तानला इशारा दिला. दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’, दहशतवादविरोधातील कारवाई आणि काश्मीर प्रश्न यावरून दोन्ही देशांतील वादाने आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले. जनरल अनिल चौहान यांनी आपल्या भाषणात नुकत्याच पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत भारताने दहशतवादाविरोधात ‘नवीन रेड लाईन’ आखली असल्याचे सांगितले.ते म्हणाले की, भारताला गेल्या दोन दशकांहून अधिक काळ दहशतवादाच्या छुप्या युद्धाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये आपण अनेक नागरिक गमावले आहेत. आता ही सहनशीलता संपवायची वेळ आली आहे. त्यांनी असेही सांगितले की, पाकिस्तानने भारताच्या या लष्करी कारवाईतून धडा घ्यावा आणि भारताच्या मर्यादेची जाणीव ठेवावी.
