राज्य सरकारची गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मोठी चर्चा आहे. राज्यभरात नेमक्या लाडक्या बहिणी योजनेत पात्र महिलांची संख्या किती हे आता आयकर विभाग सरकारला सांगणार आहे. ही माहिती मिळवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारचा केंद्रशी संपर्क सुरू आहे. अडीच लाखांच्यावर ज्यांचे उत्पन्न आहे अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजना बंद केली जाणार आहे.
या योजनेत लाडक्या बहिणींच्या जवळपास २ लाख अर्जाची छाननी केल्यानंतर राज्यातील लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अधिक घटण्याची शक्यता आहे. या योजनेत अनेक बोगस लाडक्या बहिणींची आता पोलखोल होणार आहे. दरम्यान, दोन लाख अर्जाची पडताळणी केल्यानंतर जवळपास २२८२ सरकारी कर्मचाऱ्यांनी ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभघेतल्याचे आढळून आले. यानंतर अडीच लाखांच्यावर उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांची पडताळणी करून ‘लाडकी बहीण ‘ योजना या महिलांसाठी बंद केली जाणार आहे आता राज्यभरात किती पात्र महिला आणि किती अपात्र महिला आहेत याची सगळी माहिती राज्य सरकारला आयकर विभाग देणार आहे. त्यामुळे एकूणच योजनेच्या पडताळणीत या डेटाची मदत होणार आहे. या योजनेच्या सर्व अटी व शर्ती बघितल्यास राज्यभरातून साधारण एक कोटी २० लाख महिलाच योजनेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे.
अनेक महिला अपात्र
आता पर्यंत २.३० लाख महिला संजय गांधी निराधार योजना, १.१० लाख महिलांचे वय ६५ वर्षांहून अधिक, १.६० लाख महिलांकडे चारचाकी वाहने तर ७.७० लाख महिला नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असल्याने तर शेवटी २,६५२ महिला सरकारी सेवेत कार्यरत असल्याने त्यांना योजनेचा लाभ सोडावा लागला.
