सांगोला – मे महिन्यातच भरपूर पाऊस पडल्याने माण नदीला भरपूर प्रमाणात पाणी आले आहे. राजेवाडी तलाव भरून तलावातून बाहेर पाणी वा-हू लागले आहे. हे वाहणारे पाणी सांगोला तालुक्यातील कॅनॉल, तलाव, बंधारे, ओढे, नाले भरण्यासाठी वापरण्याची मागणी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. मागणीबाबत जलसंपदामंत्री विखे पाटील यांना निवेदन केले आहे. भविष्यात पाऊस लांबण्याची शक्यता आ-हे. त्यामुळे राजेवाडी तलावातून वाहणारे पाणी तालुक्यातील शेतीसाठी उपयोगात आणणे गरजेचे आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील याचा विचार करून अधिकाऱ्यांना तसे आदेश द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
माण खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने माण नदीलाही भरपूर पाणी आले आहे. सध्या राजेवाडी तलाव भरल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. हे वाहून जाणारे पाणी सांगोला तालुक्यातील कॅनॉल, तलाव, नाले, ओढे भरण्यासाठी वापरण्यात यावे . त्यामुळे भविष्यात सध्या पेरणी होत असलेल्या पिकांसाठी त्याचा वापर होईल. तरी या मागणीचा विचार करून तलावातून वाहून जाणारे पाणी सांगोला तालुक्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे. सध्या माण नदीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. याचा उपयोग तालुक्यातील इतर गावातील तलाव, कॅनॉल, नाले, ओढे भरण्यासाठी करण्यात यावा.
