सोलापूर – २०११ च्या जनगणनेनंतर सोलापूर जिल्ह्यात नव्याने निर्माण झालेल्या आठ नगरपरिषद व नगर पंचायतीत १२ ग्रामपंचायतींचा समावेश झाला आहे. यामुळे जिल्हा परिषद गटातील एक लाख ८० हजार ३५२ इतकी लोकसंख्या कमी झाली आहे. आता राहिलेल्या लोकसंख्येचा आधार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निश्चितीसाठी घ्यावा लागणार आहे. ही माहिती राज्य सरकार तथा निवडणूक आयोगाला कळविण्यात आली असल्याने येत्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी किती गट असतील?, याची उत्सुकता लागली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर २०२२ पासून लांबलेल्या जि.प. निवडणुका २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठीची प्राथमिक स्तरावरील प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद गटाच्या निर्मितीसाठी लोकसंख्या निश्चितीचे काम सुरू आहे. २०११ च्या जनगणनेचा आधार घेतला जाणार आहे. २०११ नंतर जिल्ह्यात निर्माण झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत व त्यामुळे जिल्हा परिषद गटांतील कमी झालेल्या लोकसंख्येची माहिती देण्यात आली आहे.जिल्ह्यात अलीकडे एक नगरपरिषद व सात नगरपंचायती निर्माण झाल्या आहेत. अकलूज, माळेवाडी ग्रामपंचायतींची अकलूज नगरपरिषद, माळशिरस ग्रामपंचायतीची माळशिरस नगर पंचायत, नातेपुते ग्रामपंचायतीची नातेपेते नगर पंचायत, महाळुंग- श्रीपूर नगर पंचायत, मोहोळ नगर पंचायत, अनगर, कोंबडवाडी, खंडोळपबाचीवाडी, कुरणवाडी, नालबंदवाडी ग्रामपंचायतीची अनगर नगर पंचायत, माढा शहराची माढा नगर पंचायत, वैराग ग्रामपंचायतीची वैराग नगर पंचायत रूपांतरित करण्यात आल्या आहेत.
१ लाख एक लाख ८० हजार ३४२ इतकी लोकसंख्या जि.प. गटातून कमी झाली आहे. त्यामध्ये ३३ हजार ६६६ इतकी अनुसूचित जाती व २२९३ इतकी अनुसूचित जमातीचे लोक नगर पंचायतमध्ये समाविष्ट झाले आहेत.
तालुकानिहाय लोकसंख्या
उत्तर तालुका- १,०५,९९४ (१७,१२३), दक्षिण सोलापूर- २,६०,८९७ (३५,१५१), बार्शी- २,३५,४४२ (३२,८०३), अक्कलकोट- ३,५०,८९० (४१,०३५), माढा- २,९०,५३७ (३८,९८१), मोहोळ – २,३३,४३७ (३६,१८९), करमाळा- २,३१,२९० (३१६८२), पंढरपूर- ३,४३,४४५ (५५,९७३), सांगोला – २,८८,५२४ (४२,२९८), मंगळवेढा- १,८४,१०८ (२८,७५५), माळशिरस – ३,७९,६९ ८(६६,२२५) एकूण – २८ लाख ४ हजार ६२ (४ लाख २६ हजार २२५ लोकसंख्या)
(कंसाबाहेरील २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या व कंसात अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे). जिल्ह्यात ४८ हजार ६१५ इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
