नातेपुते – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ३० जून रोजी सोलापूर प्रवेश करत आहे. त्याचवेळी माळशिरस तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता चौथा कोरोना रुग्ण सापडला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका शिंदे यांनी दिली. माळीनगर ग्रामपंचायत हद्दीत ५४ वर्षाचा एक इसम व अकलूज नगर परिषद हद्दीत राऊतनगर याठिकाणी एक महिला, तर ६० फाटा माळशिरस येथे तिसरा पुरुष, असे तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात आता चौथा रुग्ण वेळापूर याठिकाणी आढळून आला असून, हा रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. सर्दी, ताप, खोकला व श्वासनाचा त्रास होत असल्यास ताबडतोब वैद्यकीय अधिकारी किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून सतर्क राहण्याचे आवाहन माळशिरस पंचायत समिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका शिंदे यांनी केले आहे. पाऊस भरपूर प्रमाणात झाला असल्याने व डासोत्पत्ती स्थानांत वाढ झाली आहे. नागरिकांनी सतर्क राहून पाच दिवस तालुक्यातील प्रत्येकाने घरातील कंटेनर सर्व्हे आशा व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. तसेच डेंग्यूविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तरी आपण कोरडा दिवस पाळून सहकार्य करावे. कीटकजन्य व जलजन्य आजारांबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांनी दिली.
