मंगळवेढा – मंगळवेढा शहरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त गेले पाच दिवसांपासून विविध कार्यक्रम पार पडले. या जयंती सोहळ्यामध्ये हलगी, बेंजो, लेझीम असे विविध कलाकारांचे पथक सामील होत मिरवणूक काढली. रथामध्ये अहिल्यादेवींची मूर्ती ठेवून आठवडा बाजार, चोखामेळा चौक, शिवप्रेमी चौक, दामाजी चौकमार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. हलगीचा नाद करीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयघोष करत आकाशामध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि पिवळ्या भंडाऱ्याची उधळण केली. पारंपरिक ओव्या तसेच धनगरी नृत्य याचा मिलाप पाहायला मिळाला. शनिवारी दुपारी अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीची मिरवणूक शहरातून काढण्यात आली. मिरवणुकीचे उद्घाटन दामाजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात व उद्योजक हनुमंत दुधाळ यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी मारुतीच्या पटांगणात प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणाहून मिरवणुकीला सुरुवात झाली.
मिरवणुकीत उद्योजक हनुमंत सेठ दुधाळ, अँड रवीकिरण कोळेकर, संत चोखामेळाचे सरपंच शिवाजी सलगर, मुढवीचे सरपंच महावीर ठेंगील, अध्यक्ष दामाजी मेटकरी, प्रा. नंदकुमार कोळेकर, आनंदा पडवळे, दादा लवटे, दत्ता लवटे, प्रा. प्रकाश हाके, अविनाश पाटील, डॉ. नितीन चौडे, संतोष मेटकरी, विकास दुधाळ, दत्ता मासाळ, डॉ. गिरीश मासाळ सहभागी झाले होते.
