विवाहित महिलांच्या तक्रारी वाढल्या; पुन्हा एकदा हुंडाबळीचा मुद्दा आला चर्चेला
सोलापूर -पुण्यातील एका उच्चभ्रू कुटुंबाने सुनेचा हुंड्यासाठी छळ केला होता. या छळाला त्रासून सुनेने आत्महत्या केली. त्यामुळे पुन्हा एकदा हुंडाबळीचा मुद्दा चर्चेला आला आहे. पैशाच्या लोभासाठी आणखी किती विवाहित महिलांचा जीव जाणार, असा प्रश्न आता महिला संघटना व महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, कायद्यामुळे सरळ हुंडा मागितला जात नाही, पण अप्रत्यक्ष स्वरूपात मागणी केली जाते. विवाहापूर्वी “किती तोळे सोनं?” यावर चर्चा करून हुंडा ठरवला जातो. लग्न भव्य करावं, सर्व खर्च मुलीच्या घरच्यांनी करावा असा दबाव असतो. कार, फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही अशा वस्तूंची “भेट” म्हणून मागणी केली जाते. मुलाला शिक्षण किंवा नोकरीच्या दर्जानुसार “भेटवस्तू” ठरवणे. लग्नात वरात, डीजे आणि इतर खर्च मुलीच्या कुटुंबावर टाकण्यासारखे प्रकार सुरूच आहेत. लग्नानंतर नवीन घरासाठी किंवा जमीन खरेदीसाठी पैशांची मागणी, हा एक प्रकारचा हुंडाच असल्याचे आता समोर आले आहे
महिलांनी छळ होत असल्यास कुठे तक्रार करावी ?
राज्य सरकार आणि केंद्र शासनाने महिलांना न्याय मिळावा म्हणून विविध उपाययोजना केल्या आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात निर्भया पथक, दामिनी पथक, सखी हेल्प डेस्क, महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी महिलांनी तक्रार नोंदवावी, शिवाय ११२ या डायल क्रमांकावर मदत मागावी, असे आवाहन केले आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण जे घडले त्याला महिला आयोग ही तितकेच जबाबदार आहे. कारण महिला आयोगाला तिच्या कुटुंबीयांबद्दल माहिती असतानादेखील वेळीच आयोगाने दखल घ्यायला हवी होती. आज राज्यात ठिकठिकाणी महिलांवर अत्याचार घडत आहेत, त्यात हुंडाबळी, बलात्कार, मानसिक व शारीरिक अत्याचार आहेत कठोर कायदा नाही आणि गृहखात्याचा निष्क्रियपणा ही अशा प्रकरणांसाठी जबाबदार आहे.
हुंडाबळी संदर्भात कितीही कायदे केले तरी त्याचा फारसा फरक पडत नाही. वास्तविक पाहता प्रत्येकाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. अनेक वेळा मुलीच्या आई-वडिलांनी मागणी करण्याआधीच लग्नामध्ये हुंडा दिलेला असतो. पुढे जाऊन मुलींबाबत काही अडचणी आल्यास त्याला हुंडाबळीचे स्वरुप दिले जाते. ही बाब चुकीची आहे. समाजातील प्रत्येकाने आता जागरुक होऊन हुंडा देण्याची प्रथा होणे गरजेचे आहे.
हुंडा संस्कृती कधी थांबणार?
आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. अपवाद वगळला तर प्रत्येक महिला साक्षर आहे. तरीही तिचा हुंड्यासाठी छळ होतो. ही लाजिरवाणी बाब आहे. महिलांनी याबाबत आवाज उठवावा.
कोणत्या कारणाने मागतात हुंडा…
मोहरहुन पैसे घेऊन ये,हुंडा नाही पण स्वखुशीने द्या,दहा तोळे सोने घाला,कार घेऊन द्या,बंगला बांधून हवा,उद्योगासाठी पैसे द्या
