विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दारुण अपयशाचा सामना करावा लागला. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी साद घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. पण त्यानंतर पुढे फारसे काहीच घडलेले नाही. पण आता दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता वाढली आहे. ठाकरेसेनेसोबत युती करण्यास मनसे सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु याबाबत सावधानतेने पावले टाकण्याबाबत एकमत झाल्याचे समजते. राज ठाकरेंची मनसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्राच्या हितापुढे आमचे वाद क्षुल्लक आहेत, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतरच्या पुढच्या काही तासांत उद्धव यांनी आमच्यात कधी वाद नव्हतेच. जर काही असेलच, तर ते विसरायला मी तयार आहे. सगळी भांडणे संपली, असे म्हणत उद्धव यांनी राज यांना प्रतिसाद दिला.
सावधानतेने पाऊल ?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करण्यासाठी मनसे सकारात्मक असली तरी याबद्दल आस्तेकदम धोरण स्वीकारण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे राज यांच्या पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी गेल्या महिन्याभरात युतीच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
