तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. मंदिराचे कर्मचारी, पुजारी व सेवेकरी यांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्या प्रवृत्तीवर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकण्याचे प्रकार वाढल्यामुळे मंदिराची बदनामी होत असून, भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाणे व भुंकणे यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर मंदिर बंदीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. मंदिर परिसर स्वच्छ व पवित्र ठेवण्याच्या उद्देशाने घेतलेला हा निर्णय स्तुत्य असून, भाविक व नागरिकांनी त्यास सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी केले आहे
