माळशिरस – उन्हाळी सुटीनंतर १६ जून रोजी शाळा भरणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद व अनुदानित खासगी शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यतच्या सुमारे ४७ हजार ९१७ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. माळशिरस पंचायत समिती शिक्षण विभागाकडून माळशिरस तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुमारे २ लाख ८० हजार ३७६ पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. प्राप्त पाठ्यपुस्तके तालुक्यातील शाळांतर्गत केंद्रनिहाय पोहोच केली आहेत. तेथून प्रत्येक शाळा स्तरावर विद्यार्थी संख्येनुसार वाटप करण्यात येणार आहेत. खासगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात येणार आहेत. यंदा शासनाकडून शाळा व्यवस्थापन समितीला त्यांच्या निवडीनुसार शाळा स्तरावर गणवेश वाटप करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली ते आठवीपर्यतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत, असे गटशिक्षणाधिकारी सुषमा दीक्षित यांनी सांगितले.
असे होणार पुस्तकांचे वाटप
१ ली ते आठवीमधील मराठी माध्यम २५,६७६, सेमी इंग्रजी माध्यमाच्या २२,१६९ तर उर्दू माध्यमाच्या ७९ विद्यार्थाना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. यामध्ये सर्व माध्यमांच्या मोफत पाठ्यपुस्तकात पहिलीसाठी १६,३०८, दुसरीसाठी २१,७४४, तिसरीसाठी २७,१८०, चौथीसाठी ३६,७१४, पाचवीसाठी ४६,३५४, सहावीसाठी ४०,२३६, सातवीसाठी ४४,०८६, आठवीसाठी ७४,४७४ अशी पुस्तके देण्यात येणार आहेत.
तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी व केंद्र स्तरावर केंद्रप्रमुख यांच्यावर पाठ्यपुस्तके वाटपाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सर्व पात्र शाळांनी आपापल्या केंद्राशी संपर्क साधून लाभ घ्यावा.
