पंढरपूर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत गादेगाव ग्रामपंचायत व सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे गावाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गावच्या लोकसंख्येच्या दहापट वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. ग्रामस्थांकडून मागील १० वर्षांपासून वृक्षारोपण चळवळ राबविली जात आहे. या अंतर्गत गावामध्ये आजपर्यंत जवळपास १००० देशी झाडांचे रोपण करून संवर्धन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने वड मोठ्या प्रमाणात लावण्यात आले असून, गादेगावची वडाचे झाड ही नव्याने ओळख तयार होऊ लागली आहे. विशेष ग्रामसभेमध्ये वृक्षमित्र दत्ता बागल यांनी लोकसंख्येच्या दहापट प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.गादेगाव येथील वृक्षमित्र दत्तात्रय बागल यांनी यापूर्वीही स्वखर्चातून विविध प्रकारची हजारो झाडे लावली आहेत. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. यावेळी दत्ता बागल यांच्यासह गणेश बागल, अनिल बागल, गणपत मोरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय कोळेकर, उपसरपंच दिलीप कोळी, राजेंद्र हुंडेकरी, शांतिनाथ बागल, गणेश बागल, सीताराम बागल, बालाजी देशमुख, साहेबराव कांबळे आदी उपस्थित होते.
